रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक! मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट

मुंबईत रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याणदरम्यान आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Train
Mumbai Local Train

मुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी हे अपडेट नक्की वाचा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर होणार आहे. काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होईल.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कुठे असेल मेगाब्लॉक?

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याणदरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान मेल आणि एक्स्प्रेस गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे या गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. या ब्लॉकचा परिणाम वसई रोड-दिवा मेमू सेवांवरही होणार आहे. वसई रोड येथून सकाळी 9.50 वाजता सुटणारी वसई रोड-दिवा मेमू गाडी कोपर स्थानकापर्यंतच धावेल. तसेच दिवा येथून सकाळी 11.30 वाजता सुटणारी दिवा-वसई रोड मेमू गाडी कोपर स्थानकावरून सकाळी 11.45 वाजता सुटणार आहे.

हार्बर मार्गावर लोकल गाड्या रद्द

हार्बर मार्गावर पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि पनवेल ते ठाणे मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात पनवेलहून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 दरम्यान CSMTकडे जाणाऱ्या आणि CSMTहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यान बेलापूर किंवा पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील. याशिवाय पनवेलहून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या आणि ठाण्याहून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 दरम्यान पनवेलकडे जाणाऱ्या लोकलही रद्द करण्यात येतील.

प्रवाशांना पर्यायी सेवा उपलब्ध

मेगाब्लॉकच्या काळात CSMT ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. तसेच ठाणे ते वाशी आणि नेरुळदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध राहतील. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना लोकलचे वेळापत्रक तपासावे आणि शक्य असल्यास अतिरिक्त वेळ हातात ठेवावा. रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सूचनांचे पालन केल्यास प्रवासातील गैरसोय कमी करता येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version