Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांवर तांत्रिक सुधारणा आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे मंगळवार, 03 नोव्हेंबर 2026 रोजी सलग 10 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत शटडाऊन
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10:00 वाजल्यापासून ते रात्री 8:00 वाजेपर्यंत मोर्बे मुख्य जलवाहिनीवरून होणारा पुरवठा स्थगित राहील. या तांत्रिक कामांमुळे मंगळवारी संध्याकाळचा नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असणार आहे. तसेच, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दिवशी म्हणजेच बुधवार, 04 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी शहरातील विविध भागांत अत्यंत कमी दाबाने पाणी येईल.
कोणकोणते भाग होणार प्रभावित?
या पाणी कपातीचा फटका नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या सर्व प्रमुख विभागांना बसणार आहे. याव्यतिरिक्त सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या खारघर आणि कामोठे या नोड्समधील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दोन दिवस पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे.
जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह आणि फ्लोमीटर बसवण्याचे काम
नवी मुंबईत पाण्याचे व्यवस्थापन सुलभ व्हावे यासाठी मोर्बे मुख्य जलवाहिनी आणि वितरण वाहिन्यांवर आधुनिक यंत्रणा बसवली जात आहे. यामध्ये सानपाडा मोराज सर्कल येथे 400 मि.मी बटरफ्लाय व्हॉल्व्ह, सानपाडा सेक्टर-30 व वाशी सेक्टर-19 येथे 250 मि.मी स्लुईस व्हॉल्व्ह, वाशी सेक्टर-29 आणि बेलापूर सेक्टर-28 मध्ये 700 मि.मी बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि बेलापूर सेक्टर-15 येथे 100 मि.मी व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहेत. तसेच शिरवणे गावाजवळ 800 मि.मी जलवाहिनीवर 4 नवे फ्लोमीटर बसवले जाणार आहेत.