मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खंडाळा बोरघाटात आज दोन वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनमध्ये किमी 39 जवळ कंटेनरची टाटा टेम्पोला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनं अनियंत्रित होत दरीत कोसळली.
हा अपघात सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवर घडला. या अपघातात कंटेनर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात टेम्पोचा चालक मिराज शेख हा सुखरूप बचावला. अपघातामध्ये तो जखमी झाला आहे.
अपघातानंतर टेम्पो वरतीच अडकल्यामुळे चालकाचा जीव वाचला. त्यामुळे टेम्पो चालक सुरक्षित आहे. घटनास्थळी IRB, देवदूत, डेल्टा फोर्स, अफकॉन्स, महामार्ग वाहतूक पोलीस आणि इतर बचाव पथके दाखल झाली आहेत. वाहतुकीला कोणताही अडथळा नसून परिस्थिती नियंत्रणात आहे.
या अपघातामागील नेमके कारण आणि पुढील तपास महामार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे. जखमी टेम्पो चालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहने दरीत कोसळल्याने बचावकार्याला आव्हान निर्माण झाले.