मुंबईत खळबळ! हॉटेलच्या फायर परवान्यासाठी मागितली 2 लाखांची लाच; अग्निशमन दलाचे दोन अधिकारी अटकेत

मुंबई अग्निशमन दलातील दोन अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपात ताब्यात घेतल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबईत खळबळ! हॉटेलच्या फायर परवान्यासाठी मागितली 2 लाखांची लाच; अग्निशमन दलाचे दोन अधिकारी अटकेत
Mumbai Fire Brigade Bribery Case

मुंबई अग्निशमन दलातील दोन अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपात ताब्यात घेतल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हॉटेलला फायर परवाना मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी अमोल दादासो मुळीक (39) आणि अरुण धोंडू देवाळे (44) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. अमोल दादासो मुळीक आणि अरुण धोंडू देवाळे हे दोन्ही अधिकारी मुंबई अग्निशमन दल, फोर्ट येथे कार्यरत होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, फायर परवान्यासाठी अरुण देवाळे यांनी तक्रारदाराकडे 2 लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने 18 जून 2026 रोजी एसीबीकडे केली. पडताळणीनंतर तडजोडीअंती दीड लाख रुपयांची लाच ठरली असून यापूर्वी 60 हजार रुपये दिल्याचा एसीबीच्या कारवाईत उल्लेख करण्यात आला आहे. तसेच फायर परवान्यासाठी ऑनलाइन 9 हजार रुपयांचं टोकण शुल्क भरलं होतं.

हेही वाचा- बीडमधील धक्कादायक घटना! पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून तीन विद्यार्थी अचानक बेपत्ता; रात्रीच्या जेवणानंतर…

दरम्यान मुंबई अग्निशमन दलातील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 29 सप्टेंबरला एसीबीने सापळा रचला होता. अरुण देवाळे यांच्या सांगण्यावरून अमोल मुळीकने 80 हजार रुपये स्वीकारले होते. यावेळी 80 हजारांची लाच स्वीकारताना अमोल मुळीक रंगेहाथ पकडला गेला. या प्रकरणात अरुण देवाळे यांनाही ताब्यात घेण्यात आलं असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करत एसीबी मुंबई विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शासकीय विभागातील कामकाजात पारदर्शकता आणि नागरिकांच्या तक्रारींचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांकडून लाच मागितली जात असल्यास संबंधित प्रकरणाची माहिती एसीबीपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले असून, अशा तक्रारींच्या आधारे कायदेशीर प्रक्रियेनुसार चौकशी आणि कारवाई केली जाऊ शकते. या प्रकरणातील पुढील तपास एसीबीकडून सुरू असून, तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number