बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील फुले पिंपळगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात राहणारे तीन विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणानंतर उपस्थिती तपासली असता दहावीतील तेजस चव्हाण, दिनेश चव्हाण आणि अभिजीत राठोड हे तिघेही वसतिगृहात आढळून आले नाहीत.
विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात येताच व्यवस्थापनाने परिसरासह आसपासच्या भागात शोध सुरू केला. तिन्ही विद्यार्थी अनुक्रमे पाथरी, नित्रुड आणि आष्टी येथील असल्याची माहिती आहे. मात्र हे विद्यार्थी वसतिगृहातून नेमके कधी आणि कोणत्या मार्गाने बाहेर पडले, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. दरम्यान, नातेवाईक वसतिगृहात दाखल झाले असून, विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुले गायब झाल्यानंतर महिला पालकांनी पोलिस ठाण्यातच हंबरडा फोडला. याप्रकरणी माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही बेपत्ता मुलांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शाळा प्रशासन, पालक तसेच संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांकडूनही त्यांचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. दरम्यान, विद्यार्थी कुठे गेले, ते कोणाच्या संपर्कात होते आणि वसतिगृहातून बाहेर पडण्यामागे नेमके कारण काय, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणातील उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित यंत्रणा विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न करत असून, पुढील तपासानंतर या घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.