नाशिक, ११ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुक तयार चालु झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील दोन्ही उमेदवार नाशिकच्या जागेसाठी इच्छुक होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ आणि शिवसेनेकडून हेमंत गोडसे या दोन नावांची चर्चा होती मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यापासून छगन भुजबळ एकदाही प्रचारात सहभागी झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ प्रचारापासून अलिप्त होते. त्यामुळे लोकांमध्ये भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा दिसून आल्या. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच छगन भुजबळ प्रचारात सहभागी झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.