रायगड जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील राजकीय वाद आता अधिक उफाळून आला असून, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे. अर्थ मंत्रालय पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अलिबाग येथील शिवसेनेच्या तब्बल 200 हून अधिक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करत हाती ‘घड्याळ’ बांधले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी रायगडमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुनील तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
हा मोठा राजकीय फेरबदल अलिबाग मतदारसंघातील शेनवाई परिसरातील आदिवासी पाड्यावर घडून आला आहे. हा भाग स्थानिक शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा मजबूत गड मानला जातो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात शिवसेनेच्या 200 हून अधिक स्थानिक नेत्यांनी व ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तटकरे यांनी सर्व नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक आमदारांच्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने मारलेला हा दणका शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महायुतीत असूनही रायगडमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र
राज्य स्तरावर महायुतीचे सरकार एकत्र काम करत असले, तरी रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जुना राजकीय वैर आणि संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्थानिक नेते आमनेसामने आले आहेत. स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून परस्परांचे कार्यकर्ते गळाला लावण्याची जोरदार स्पर्धा सुरू आहे.
स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत
या प्रवेशामुळे अलिबाग आणि आसपासच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला आपले संघटनात्मक नेटवर्क अधिक विस्तारण्याची मोठी संधी मिळाली आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागात थेट सुरुंग लावल्यामुळे खासदार सुनील तटकरे यांनी रायगडच्या राजकारणावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. या घडामोडीनंतर आता शिंदे गटाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.