दिल्लीतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानके बंद ठेवण्याच्या निर्णयावर आणि काही रेल्वेगाड्या रद्द केल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘तरुणांची एवढीच भीती वाटत असेल, तर अख्खा देशच बंद करा,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
सीजेपीकडून 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून केली जाणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरूनही संघटनेने आक्षेप नोंदवले आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 57 मेट्रो स्थानके बंद ठेवण्याची विनंती केली आहे. याशिवाय, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होणार नाही का, असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला. आंदोलनासाठी निश्चित केलेल्या जंतरमंतरवरही निर्बंध का, असा प्रश्न त्यांनी विचारला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता असून, या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.