महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असताना, पुण्याच्या इंदापुरात आज भाजप नेते प्रवीण माने यांच्या सोनाई पॅलेस निवासस्थानी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर हे बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम करून प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांना सोबत घेत कृष्णा भीमा विकास आघाडी निर्माण केली.
या आघाडीच्या जोरावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना आव्हान देत प्रदीप गारटकर यांनी स्वतः नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवलेली. यात प्रदीप गारटकर यांचा अवघ्या 127 मताच्या फरकाने पराभव झाला होता. त्यानंतर प्रदीप गारटकर येत्या पंधरा दिवसात पुणे जिल्ह्यासह इंदापुरातील दिग्गजांना घेऊन भारतीय जनता पार्टीत प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर इंदापूरमध्ये राजकीय उलटपालट होणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात अजित पवार यांना आव्हान देण्यासाठी भाजप एक पाऊल पुढे टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर सर्वपक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून ते जोरदार तयारीला लागले आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. शेवटच्या क्षणापर्यंत अनेकठिकाणी यावरुन गोंधळ पाहायला मिळाला. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कोण आपल्या पक्षाचा झेंडा मुंबई महानगपालिकेवर फडकवणार याकडे संपुर्ण मुंबईकरांच लक्ष लागून राहिलेलं आहे.