मुंबई: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा आझमींनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अबू आझमींच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केली.
अमोल मिटकरी म्हणाले:
'ऐन वारीच्या वेळेवर अबू आझमी यांचं आलेलं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट आहे', अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी केली. 'अबू आझमी यांना वारकरी संप्रदायाबद्दलचं ज्ञान नसल्याने त्यांनी आधी वारकरी संप्रदायाबद्दल अभ्यास करावा', असं देखील पुढे मिटकरी म्हणाले.
हेही वाचा: 'शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी...' - मंत्री गुलाबराव पाटील
काय म्हणाले एकनाथ खडसे?
अबू आझमींच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे म्हणाले की, 'अबू आझमी जे भाष्य करतात ते वादग्रस्त असतं. ते अतिरेकी आणि धर्माशी जोडलेली विधाने करतात'. पुढे खडसे म्हणाले की, 'नमाज पठणाला कोणीही विरोध केला नाही, आणि पांडुरंगाच्या वारीला देखील केला नाही. या देशात आणि राज्यात दोन्ही समाज एकत्र नांदत असताना राजकारण्यांच्या सोयीसाठी काही लोक वेगवेगळे वक्तव्य करत आहेत'.
हेही वाचा: ABU AZMI CONTROVERSY: पालखी सोहळ्याबाबत अबू आजमींनी केले वादग्रस्त वक्तव्य
अबू आझमी म्हणाले:
रस्त्यावर होणाऱ्या उत्सवांबद्दल कोणत्याही मुस्लिमाने कधीही तक्रार केलेली नाही. पण जेव्हा मशीद पूर्ण भरते, तेव्हा मशीदीतल्या काही लोक रस्त्यावर 5 ते 10 मिनिटे नमाज पठण करतात. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की, ''रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करू''. पुण्याहून येताना लोकांनी मला लवकर निघायला सांगितले, अन्यथा पालखीमुळे रस्ता बंद होईल. रस्ता बंद आहे, पण आम्ही कधीही तक्रार केली नाही. मात्र रस्त्यावर नमाज केल्यास लगेच तक्रार केली जाते', असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.