अमरावती शिक्षक मतदारसंघात अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट! महायुतीतील तीन बंडखोरांची माघार; आता मैदानात किती उमेदवार?

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट झाले असून महायुतीतील तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे.
Amravati Teachers Constituency
Amravati Teachers Constituency

अमरावती : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर एकूण 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. दरम्यान, महायुतीतील तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, महायुतीतील काही बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने पक्षश्रेष्ठींसमोरील आव्हान अद्याप संपलेले नाही.

महायुतीतील तीन उमेदवारांची माघार

अमरावती शिक्षक मतदारसंघातून पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज चव्हाण, युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती रेवने आणि प्रहार सामाजिक संघटनेचे नितीन आगे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांची संख्या कमी झाली असून अंतिम लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना शिंदे सेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

महायुतीतील बंडखोरी कायम

एकीकडे काही उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी महायुतीतील बंडखोरीचे आव्हान कायम आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे, भाजपचे शेखर भोयर आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. संगीता शिंदे-बोंडे आणि शेखर भोयर यांच्या उमेदवारीमुळे भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर श्रीकांत देशपांडे यांच्या भूमिकेमुळे शिंदे सेनेलाही आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. बंडखोरांची माघार घडवून आणण्याचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न यशस्वी झाले नसल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीकडून कोण मैदानात?

महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे आणि उद्धव ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. आता एकूण 26 उमेदवारांमध्ये मतांचे विभाजन कसे होते, बंडखोर उमेदवार किती प्रभाव पाडतात आणि शिक्षक मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा निकालावर किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version