दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी आणि दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील ट्रिगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ, याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर होणार आहेत. या निर्णयामुळे दुष्काळाची दाहकता अनुभवत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे. दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
यानंतर आता फडणवीसांच्या या निर्णयावर विरोधी नेत्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन आणि महाआरतीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, “पांडुरंगाला घातलेलं साकडं पांडुरंगाने अर्ध्या तासात ऐकलं. शासनाने दुष्काळाचा जीआर काढला आहे. उशिरा का होईना सरकारने निर्णय घेतला याचे आम्ही स्वागत करतो. दुष्काळाचा काढण्यात आलेल्या जीआर चा अभ्यास करून याबाबत अधिक बोलू. शासनाने दुष्काळाबाबत जीआर काढला याबाबतचे समाधान. मुख्यमंत्री स्वतः फिल्डवर होते, त्यामुळे त्यांनी पवार साहेबांच्या सूचनांचा नक्की विचार केला असेल.”
दुष्काळाच्या विविध उपाययोजना
जमीन महसुलात सूट
पीक कर्जाचे पुनर्गठन
शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट
(7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट)
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देणार असून रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार.
आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स, तर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही.
शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार, जनावरांच्या चार्याची व्यवस्था करणार
जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार. त्याचसोबत पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार. पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश देण्यात आले असून पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.