सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगूल वाजत आहे. असं असताना पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सुरु रस्सीखेच होती. मात्र पुणे शिक्षक मतदारसंघ या जागेसाठी भाजपने मोठी खेळी केली असून पुणे आणि नागपूरची जागा आपल्या कोट्यात घेतली आहे. अशातच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जागावाटपाचा निर्णय आणि उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान इच्छुकांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान पुणे शिक्षक मतदार संघाची जागा जरी महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली असली तरी देखील मंगेश चिवटे हे आता मंगळवारी पुणे शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
त्यानंतर आता भाजपने आणखी एक मोठं धक्कातंत्र दिलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 मधील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यावेळी पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभागातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना तिकीट जाहीर झालंय. तसेच पुणे विभागातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी मिळाली आहे.
कोण आहेत डॉ. स्मिता जाधव?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 मधील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. (श्रीमती) स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने डॉ. स्मिता जाधव यांच्या नावाला अधिकृत मंजुरी दिली आहे. डॉ. जाधव या शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्या पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू आहेत. तसेच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
डॉ. स्मिता जाधव यांनी पीएच.डी. (एज्युकेशन), एमबीए (फायनान्शियल मॅनेजमेंट) आणि बीई (कॉम्प्युटर्स) या पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्या पुढारी पब्लिकेशनच्या संचालक असून टोमॅटो 94.3 एफएम आणि आपलं एफएम 91.9 च्या कार्यकारी संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान असून कस्तुरी क्लबच्या माध्यमातून १८ हजारांहून अधिक महिलांचे नेटवर्क उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महिलांना सामाजिक सहभाग, नेतृत्व आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील नवकल्पना, सर्जनशीलता आणि धोरणात्मक नेतृत्वासाठी त्यांना वेणुताई चव्हाण युवती पुरस्कार, ग्लोबल वुमेन इन्स्पिरेशन अवॉर्ड, एज्युप्रन्योर ऑफ द इयर, बेस्ट सीईओ, आउटस्टँडिंग लीडरशिप इन हायर एज्युकेशन आणि प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड यांसह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीमुळे भाजपने शिक्षण आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील अनुभवी चेहऱ्याला संधी दिल्याचे मानले जात आहे.