CJP Protest: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अनागोंदी आणि गलथान कारभाराविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या पक्षाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील ऐतिहासिक दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर भव्य आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाला अधिकृत परवानगी मिळावी यासाठी पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याला अधिकृत पत्र पाठवले आहे. हे आंदोलन पूर्णपणे घटनात्मक मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने पार पडणार असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
सोनम वांगचुक यांचा पाठिंबा
दरम्यान, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. देशातील लोकशाही अन् निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रयत्नांना साथ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, “माझी प्रत्यक्ष उपस्थिती नसली तरीही लोकशाहीच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या चळवळी स्वयंपूर्ण राहून पुढे गेल्या पाहिजेत.” निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर नागरिक स्वतःहून पुढे येत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
निवडणूक आयुक्तांच्या आक्षेपांनंतर वाद वाढला
गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार नोंदणी, यादीतील नावे वगळणे, ती पुनर्संचयित करणे आणि मतदार याद्यांची सखोल पुनर्तपासणी यांसारख्या अत्यंत संवेदनशील निर्णयांवर किमान 14 वेळा लेखी स्वरूपात गंभीर आक्षेप नोंदवले होते. हे वृत्त समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर आणि एकूणच कामकाजावर राज्यभरातून मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने थेट रस्त्यावर उतरून एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.