INDIA Alliance Protest: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे आंदोलन पेटले असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. गुरुवारी विरोधकांनी काढलेल्या मोर्चामुळे आणि नवी दिल्ली परिसरात झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे तब्बल 5,000 हून अधिक प्रवाशांच्या ट्रेन सुटल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेले हे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, दिल्लीतील प्रमुख रस्ते अडवल्याने रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.
वाहतूक कोंडीमुळे रेल्वे स्थानकांवर पोहोचणे झाले कठीण
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षाच्या निदर्शनांमुळे नवी दिल्ली आणि मध्य दिल्लीतील अनेक रस्ते पूर्णपणे ठप्प झाले होते. यामुळे प्रवाशांना वेळेवर रेल्वे स्थानकांवर पोहोचणे अशक्य झाले. मिंटो ब्रिज हा नवी दिल्ली रेल्वे स्थानकाकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे; मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांचा ताफा या मार्गावरून जात असताना हा रस्ता सुमारे 3 तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. परिणामी, स्थानकाकडे जाणाऱ्या गाड्यांच्या रांगा लागल्या आणि हजारो प्रवाशांना आपल्या निर्धारित गाड्या गमवाव्या लागल्या.
राजधानी आणि वंदे भारत गाड्यांना फटका
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका दिब्रुगड राजधानी, मुंबई राजधानी, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस आणि काही स्थानिक गाड्यांमधील प्रवाशांना बसला. वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक प्रवाशांची विमाने आणि गाड्या हुकल्या, तर काही ‘आयआरसीटीसी’ (IRCTC) ग्रुप बुकिंग्ज देखील रद्द कराव्या लागल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 12 नंतर नवी दिल्ली परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.
हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 42 माजी न्यायाधीश सरसावले; विरोधकांच्या आरोपांवर लिहिलं इशारा देणार पत्र
विरोधी पक्षांचे आंदोलन सुरूच; राजघाटाकडे काढला मोर्चा
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीच्या आंदोलनाचा गुरुवारी तिसरा दिवस होता. राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनी कनॉट प्लेस येथे एकत्र येत राजघाटाच्या दिशेने कूच केले. यापूर्वी 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाला घेराव घालण्याचा प्रयत्न आणि बुधवारी जंतरमंतरकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला होता. आपल्याला शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्यापासून सातत्याने रोखले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.