मुंबई : भारतीय संविधान, लोकशाही आणि संसदीय व्यवस्थेवर भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ‘जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे, तोपर्यंत निर्णय संसदेतच होणार,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संविधानाची ताकद, निवडणुकांद्वारे सत्ताबदल आणि नागरिकांच्या न्यायाच्या अधिकारावरही भाष्य केलं.
‘हा भारत आहे, पाकिस्तान नाही’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘हा भारत आहे, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ नाही. त्यांच्याकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान नाही. जोपर्यंत संविधान आपल्याकडे आहे, तोपर्यंत निर्णय संसद घेईल, इतकी ताकद आपल्या संविधानात आहे.’
गेल्या काही वर्षांत संविधान आणि लोकशाही व्यवस्थेला आव्हान देण्याचे प्रयत्न झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मात्र, भारतीय संविधानाची ताकद मोठी असून देशाची लोकशाही व्यवस्था टिकून असल्याचं त्यांनी नमूद केलं.
सत्ताबदलाबाबत बोलताना फडणवीस यांनी निवडणुकांच्या प्रक्रियेवर भर दिला. देशातील सत्ता बदलण्याचा मार्ग हा निवडणुकांमधूनच जातो, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
विद्यार्थ्यांसाठी दोन महत्त्वाच्या पुस्तिकांचं प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्र आणि संवैधानिक मूल्यांची ओळख व्हावी, यासाठी ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचं प्रकाशन करण्यात आलं.
‘स्मार्ट नागरिक’ पुस्तिकेतून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तर ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली आहे.
‘संविधान संधीची समानता आणतं’
भारतीय संविधान केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून ते नागरिकांना न्याय, समानता आणि संधी उपलब्ध करून देणारं माध्यम आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. विविध जाती, धर्म आणि प्रदेशांतील नागरिकांना एकत्र ठेवण्याचं काम संविधान करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध देशांच्या घटनात्मक व्यवस्थांचा अभ्यास करून भारतीय समाजाच्या गरजांचा विचार करत संविधाननिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. संविधानातील मूल्ये भविष्यातही महत्त्वाची राहतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना लहान वयातच संविधानाची ओळख करून देणं आणि त्यांच्यात लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करणं, या उद्देशाने या पुस्तिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.