मुंबई : एकीकडे कॉकरोच जनता पार्टी (CJP) देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असल्याचा दावा करत असतानाच, त्यांच्या मंचावरून झालेल्या एका विधानामुळे आंदोलनाला मोठा राजकीय फटका बसला आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एका पत्रकार परिषदेत “आम्हाला देशात सत्ता परिवर्तन हवे आहे” असे उघड विधान केले होते. प्रशांत भूषण यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडी आणि सीजेपीवर जोरदार निशाणा साधला आहे. “It’s done bro, everything is exposed! शेवटी मनातील खरी गोष्ट ओठांवर आलीच,” असे ट्विट करत फडणवीस यांनी हे सर्व आंदोलन केवळ सत्तेसाठी चालू असल्याचा आरोप केला.
It’s done bro, everything is exposed !!
Afterall, it was all about ‘Regime Change’.. आखिर मन में छुपी बात होठों पर आ ही गई! सारा खेल सत्ता की कुर्सी पाने का है.. फिर उसके लिए विद्यार्थियों, किसानों को उकसाना ही क्यों ना पडे, जाति और भाषा के नाम पर द्वेष फैलाना पडे, या देश की प्रतिष्ठित संस्थाओं की प्रतिमा मलीन करनी पडे। आंदोलन की आड में अराजकता फैलाना ही ‘इनका’ उद्देश है। #Maharashtra — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2026
देशात अराजकता पसरवण्याचा कट – फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटले की, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना भडकावणे, भाषा तसेच जातीच्या आधारावर समाजात द्वेष पसरवणे आणि देशातील घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलीन करणे हा या आंदोलनाचा खरा हेतू आहे. आंदोलनाच्या बुरख्याखाली देशात अराजकता माजवणे हाच विरोधकांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. तरुणांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून बांगलादेशच्या धर्तीवर देशात सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
अभिजीत दीपकेंचे मध्यरात्री स्पष्टीकरण
भाजप नेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांना मध्यरात्री तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. “आमचा उद्देश सत्ता बदलायचा नसून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आमची मुख्य मागणी आहे,” असे दीपके यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी नसताना आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांची सहमती न घेता ज्ञानेश कुमार यांनी ‘फॉर्म 6’ मध्ये बदल केले, असा आरोप त्यांनी केला. आपण कधीही सत्तांतराची भाषा केली नसून केवळ निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.