देशाची राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘सीजेपी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचून दिल्ली पोलिसांनी त्यांना एक अधिकृत नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे त्यांना कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘लहरा दो तिरंगा’ निषेध मोर्चा काढण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने राणी झाशी रोडवरील त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडली.
हेही वाचा – ‘CJP च्या आंदोलनामागे एलॉन मस्क…’; भाजपच्या माजी खासदाराच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण
कनॉट प्लेस परिसरात बीएनएसएस चे कलम 163 लागू
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, एनडीएमसी (NDMC) कडून या ‘तिरंगा यात्रे’साठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. सेंट्रल पार्क हे आंदोलनासाठी अधिकृत ठिकाण नसल्यामुळे तिथे निदर्शने करण्यास बंदी आहे. अभिजीत दीपके किंवा त्यांचे समर्थक लाऊडस्पीकर आणि इतर साहित्यासह तिथे पोहोचले, तर त्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.
घरभोवती पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांची गस्त
सध्या अभिजीत दीपके हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते अनिश गावंडे यांच्या घरी वास्तव्यास आहेत. पोलिसांचे एक पथक अनिश गावंडे यांच्या घरी देखील पोहोचले होते. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी तीव्र भीती व्यक्त केली आहे. “दिल्ली पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या जवानांनी मी थांबलेल्या घराला पूर्णपणे वेढा घातला आहे. मी बाहेर पडतो तेव्हा नंबर प्लेट नसलेली संशयास्पद वाहने माझा पाठलाग करतात. पोलीस मला कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात,” असा आरोप दीपके यांनी केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचे स्पष्ट केले आहे.