साताऱ्यात घशात चॉकलेट अडकल्याने चिमुरडीचा मृत्यू
घशात जेली चॉकलेट अडकल्याने साताऱ्यात एका चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणारी ही घटना कर्मवीरनगर, कोडोली, सातारा आहे. या घटनेत जेली चॉकलेट खाताना ते घशात अडकल्याने एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. शर्वरी सुधीर जाधव असे या चिमुकलीचे नाव आहे. चिमुकल्या शर्वरीला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिले. शर्वरीने हे जेली चॉकलेट न चावता गिळले. त्यामुळे, जेली चॉकलेट तिच्या घशात अडकले आणि शर्वरी खोकू लागली. तिचा श्वास कोंडल्याने शर्वरी बेशुद्ध पडली. शर्वरीच्या आईला हा प्रकार लक्षात येताच तिने मुलीसह तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. उपचारापूर्वी शर्वरीने प्राण सोडल्याचे डॉक्टरांनी सांगताच जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चॉकलेटची सवय सोडवण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. काय आहेत पर्याय पाहा,
लहान मुलांवर बारीक लक्ष द्या.
लहान मुलांना चॉकलेटचे आमिष दाखवू नका.
चॉकलेट ऐवजी इतर पदार्थांची गोडी लावा.
मुलांना प्रत्येक गोष्ट चावून खायला शिकवा.
मुलांना पौष्टिक अन्न द्यावे.