Eknath Shinde Criticizes Congress in Thane Rally: ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या ‘लोकतंत्र बचाव पदयात्रेत’ कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या पदयात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. रॅलीनंतर पार पडलेल्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. 2014 पूर्वीच्या कार्यकाळातील धोरणांवर बोट ठेवत त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून देशात झालेल्या सकारात्मक बदल झाल्याचे ते म्हणाले.
परदेशी भूमीवरून भारताची बदनामी केल्याचा आरोप आणि पायलट स्मित मच्छार प्रकरणावरून टीका
भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या प्रकरणाचा विशेष उल्लेख केला. पायलट स्मित मच्छार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले प्रेरणास्थान असल्याचे जाहीरपणे विधान केले होते. यामुळे विरोधकांच्या पोटात दुखले आणि त्यांनी जगभरात कौतुक झालेल्या या शूर पायलटला साधा फोनही केला नाही, असा खळबळजनक दावा शिंदे यांनी केला. विरोधक परकीय शक्तींशी हातमिळवणी करून विदेशात भारताची आणि पंतप्रधानांची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
32 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा; अर्थव्यवस्था थेट चौथ्या क्रमांकावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामगिरीचा गौरव करताना शिंदे म्हणाले की, जगातील अनेक अर्थव्यवस्था संकटात असताना भारताची अर्थव्यवस्था जगात थेट 4 नंबरवर पोहोचली आहे. तसेच, पारदर्शक कारभार करत मोदी सरकारने देशातील तब्बल 32 कोटी जनतेला गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे. मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसून संपूर्ण देशातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. विरोधकांकडून मोदींवर आणि देशाच्या लष्करावर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेचा त्यांनी तीव्र निषेध केला.
विरोधकांचे आंदोलन म्हणजे लोकशाहीचा अपमान; पुढील 50 वर्षे सत्तेत येणे अशक्य
विरोधकांनी न्यायालयावर काढलेला मोर्चा आणि पंतप्रधानांच्या घराबाहेर केलेले आंदोलन हा लोकशाहीचा अपमान असून तो एक काळा दिवस होता, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. जनतेने विरोधकांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे आणि त्यामुळेच वैफल्यातून हे राजकारण केले जात आहे. विरोधकांचे हे पाप जनता कधीही माफ करणार नाही आणि पुढील 50 वर्षे विरोधक सत्तेत येऊ शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. मतचोरीच्या आरोपांचा समाचार घेत शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामांचा आणि लोकशाही मूल्यांचा पुनरुच्चार केला.