बारामती तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर झालेली असतानाही पक्षादेश पूर्णपणे पायदळी तुडवून स्वतंत्र पॅनेल उभे करणारे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर पक्षाने अखेर बडतर्फीची मोठी कारवाई केली आहे. पक्षाची शिस्त मोडून बंडखोरी केल्यामुळे जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनेलमधील सर्व बंडखोर सहकाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत माहिती शुक्रवारी बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचारसभेत बोलताना पक्षातून बाहेर पडलेल्या बंडखोरांना पुन्हा कधीही पक्षात स्थान दिले जाणार नाही असे स्पष्ट केल्याने, जगताप यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांसाठी पक्षाचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत.
दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला लगाम
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेगावकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, संभाजी होळकर आणि नगराध्यक्ष सचिन सातव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही कारवाई जाहीर केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात पक्षाची शिस्त न पाळता जगताप यांनी वेगळे पॅनेल स्थापन केले. एवढेच नव्हे तर, प्रचारादरम्यान ‘आपण अजूनही पक्षातच आहोत’ असे भासवून कारखान्याच्या सभासदांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार एकमताने ही तडकाफडकी कारवाई करण्यात आल्याचे कोरेगावकर यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान, सतीश काकडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, ही क्लिप एआय (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार करण्यात आली असल्याचे स्वतः काकडे यांनी स्पष्ट केले असल्याचा निर्वाळाही कोरेगावकर यांनी दिला.
हेही वाचा – मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे चित्र स्पष्ट; 13 उमेदवारांची माघार; आता 41 जणांमध्ये होणार लढत
जिल्हाध्यक्षांच्या उशिरा येण्याने पत्रकार संतप्त
या संपूर्ण राजकीय घडामोडींसोबतच पत्रकार परिषदेच्या ठिकाणी एक वेगळाच नाटकीय प्रसंग घडला. सकाळी 9.30 वाजता आयोजित केलेल्या या परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेगावकर तब्बल 10.15 वाजेपर्यंत उपस्थित राहिले नाहीत. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अजितदादांसारखे नेतृत्व आयुष्यभर वेळेचे तंतोतंत पालन करण्यासाठी ओळखले जात असताना, त्यांच्याच जिल्हाध्यक्षांना वेळेची शिस्त नसल्याचे सांगत बारामतीतील पत्रकारांनी तीव्र शब्दांत संताप आणि नाराजी व्यक्त केली. अखेर स्थानिक नेत्यांनी मध्यस्थी करून पत्रकारांची समजूत काढल्यानंतरच ही पत्रकार परिषद पार पडली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.