सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठा ट्विस्ट! अजित पवारांचे नाव-फोटो वापरण्यास बंदी; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचे नाव, फोटो आणि प्रतिमा प्रचारात वापरण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. जय पवारांच्या हरकतीनंतर हा निर्णय झाला.

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठा ट्विस्ट! अजित पवारांचे नाव-फोटो वापरण्यास बंदी; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश
अजित पवारांचे नाव-फोटो वापरल्यास कारवाई!

बारामती : बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचारावरून मोठा निर्णय समोर आला आहे. कारखान्याच्या निवडणूक प्रचारात दिवंगत अजित पवार यांचे नाव, छायाचित्र किंवा प्रतिमा वापरण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या प्रचाराला मोठा बदल करावा लागणार आहे. जय पवार यांनी दाखल केलेल्या हरकतीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी यासंदर्भात आदेश दिल्याचे वृत्त आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेल’ निवडणूक रिंगणात उतरले आहे. या पॅनेलच्या नावासह विविध प्रचार साहित्यामध्ये अजित पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरले जात असल्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली.

हेही वाचा: देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पक्ष थेट ‘INDIA’ आघाडीत दाखल

या तक्रारीनंतर आता अजित पवार यांचे नाव किंवा प्रतिमा असलेले फ्लेक्स, बॅनर, पोस्टर, स्टिकर, पत्रके तसेच इतर मुद्रित साहित्य वापरणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केवळ प्रत्यक्ष प्रचार साहित्यापुरताच हा आदेश मर्यादित नसून इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातून होणाऱ्या प्रचारालाही हे निर्देश लागू असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी लावण्यात आलेले संबंधित प्रचार साहित्यही हटवण्यास सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी राष्ट्रवादीकडूनही अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव किंवा छायाचित्र वापरू नये, अशी भूमिका मांडण्यात आली होती. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील प्रचाराचा हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे.

पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यानंतर सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध गट आणि पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असून, कारखान्याच्या नेतृत्वासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: “मी वर्गीकरण होऊ देणार नाही, शिंदेंसारखे पाच जण जरी आले तरी…” मातंग समाजाच्या मुद्द्यावरून सदावर्तेंचा सूर चढला

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून संबंधित प्रचार साहित्य हटवण्यात आले आहे किंवा नाही, याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास निवडणूकविषयक तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच बारामतीतील राजकीय वातावरण चर्चेत आहे. अशातच अजित पवारांच्या नाव आणि छायाचित्राच्या वापरावर निर्बंध आल्याने निवडणूक प्रचाराचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. आता पुढील काळात विविध पॅनेल कोणती रणनीती स्वीकारतात आणि निवडणुकीचे अंतिम चित्र कसे उभे राहते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number