मानपाडा येथील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. तर दुसरीकडे राम पूर्णेकर यांच्या नेतृ्त्वात पूर्णेकर कुटुबीयांनी आज आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, ठाणे पोलिसांनी राम पूर्णेकर यांना आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले.
त्यानंतर, दुपारी 1 वाजल्यापासून आता साधारण 7 वाजेपर्यंत नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या सुरू केला. तसेच जोपर्यंत मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक होत नाही, तोपर्यंत नौपाडा पोलीस ठाणे सोडणार नाही, असा प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबांसह, सर्वपक्षीय नेते आणि पुर्णेकर समर्थकांनी निर्धार केला. यादरम्यान मिनाक्षी शिंदे यांची पोलिसांकडून आज तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
हेही वाचा- राम पूर्णेकरच्या अटकेनंतर उबाठा-मनसे आक्रमक; नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
मिनाक्षी शिंदे म्हणाल्या की, “माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका तीच आहे पोलिसांनी जेव्हा बोलावेल तेव्हा इन्वेस्टीगेशनसाठी मी हजर राहीन. त्या प्रकारे मी पोलिसांना सहकार्य केलेलं आहे, त्यांनी बोलावल्यानंतर येऊन चौकशीला सामोरे गेले. पुन्हा चौकशीला बोलावलंय, अजून तर कल्पना नाही, ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी मी नक्की येईन. माझ्यासोबत फोटो आहेत त्याबद्दल प्रभागात राहणाऱ्या लोकांचे फोटो माझ्यासोबत असणारच आहेत, त्याचा जर इशू करत असतील तर… एका भागात राहतात तर ओळखणारच ना, मी हे मागे पण तुम्हाला क्लियर केलं होतं. तेच तेच प्रश्न जर रिपीट होत असेल तर… समोर आले होते.”
“पोलीस इन्वेस्टीगेशनचा भाग आहे आणि सगळ्याच गोष्टी जर मीडिया समोर एक्सपोज करायला लागले तर मग उपयोग काय? त्याला अर्थच राहत नाही. पोलिसांची चौकशी चालू आहे, त्या गोष्टी मी इथे समोर बोलायला लागले तर त्याला काय अर्थ राहील? लहानातला लहान मुलगा पण सांगू शकतो की पाखरं हाकलण्यासाठी गावामध्ये तशा बंदुका असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये असतात त्याच्यावरती जर ते समस्या करत असतील तर त्याला मी काय उत्तर देऊ. मला माहिती नाही कारण माझं इन्वेस्टीगेशन इथे चालू होतं, माझा जवाब नोंदवला जात होता.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.