Sunday, November 16, 2025 05:39:35 PM

Governor Anandiben Patel: 'लिव्ह-इनमध्ये राहिलात, तर तुमचे 50 तुकडे होतील'; राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं वक्तव्य चर्चेत

वाराणसीमध्ये आयोजित महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलेले विधान सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

governor anandiben patel लिव्ह-इनमध्ये राहिलात तर तुमचे 50 तुकडे होतील राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं वक्तव्य चर्चेत

Governor Anandiben Patel: वाराणसीमध्ये आयोजित महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलेले विधान सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल इशारा देत म्हटले, “अशा नात्यांमध्ये पडू नका, नाहीतर तुमचे 50 तुकडे होतील.”

राज्यपालांच्या या भाषणानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्यांच्या विधानाचे समर्थन केले तर काहींनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहींच्या मते त्यांनी दिलेला सल्ला सामाजिक वास्तवावर आधारित असला, तरी “50 तुकडे” हा शब्दप्रयोग अतिरेकाचा आहे.

हेही वाचा: EC Bans Use of AI Generated Videos: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एआय-जनरेटेड व्हिडिओच्या वापरावर बंदी

आपल्या भाषणात आनंदीबेन पटेल यांनी तरुण मुलींच्या सुरक्षेचा आणि भवितव्याचा मुद्दा उचलला. त्या म्हणाल्या, “आजच्या काळात लिव्ह-इन नावाखाली अनेक फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. नाती तात्पुरती बनवली जातात आणि त्याचे परिणाम मुलींनाच भोगावे लागतात. म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या.” त्यांनी पुढे सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांनी एका अनाथाश्रमाला भेट दिली असता अल्पवयीन मुलींच्या हातात बाळ दिसले. “त्या कहाण्या ऐकताना मन हेलावून गेलं,” असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर त्यांनी न्यायव्यवस्थेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यापीठांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची सूचना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांनी पोक्सो कायद्याचा उल्लेख करत म्हटले की, “कायद्याने संरक्षण दिले तरी समाजात भीती निर्माण व्हावी, अशा घटना घडू नयेत. शिक्षण आणि संस्कार हेच यावर उपाय आहेत.” बलिया येथील एका पूर्वीच्या समारंभातही त्यांनी अशाच आशयाचे वक्तव्य केले होते. तिथे त्यांनी म्हटले होते की, “लिव्ह-इन रिलेशनशिपचे वास्तव पाहायचे असेल तर अनाथाश्रमात जा.” या वक्तव्यामुळेही तेव्हा वाद निर्माण झाला होता.

हेही वाचा: Ban On Cough Syrup: खोकल्याच्या 'या' तीन सिरप उत्पादनांवर बंदी; भारताकडून WHO ला अहवाल सादर

त्यांच्या भाषणात त्यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आणि आपले आयुष्य उदात्त ध्येयासाठी समर्पित करण्याचे आवाहन केले. “तुमचं आयुष्य मौल्यवान आहे, ते अशा नात्यांमध्ये वाया घालवू नका,” असा सल्ला त्यांनी दिला.या वक्तव्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या वक्तव्याला “संस्कृतीचा सन्मान” असे म्हटले, तर काहींनी विचारले  “महिलांना भीती दाखवून स्वातंत्र्य मर्यादित करणे योग्य का?” तरीही, आनंदीबेन पटेल यांनी मांडलेला मुद्दा हा आजच्या तरुण पिढीतील नातेसंबंध आणि मूल्यव्यवस्थेवर विचार करायला भाग पाडणारा ठरला आहे.


सम्बन्धित सामग्री