कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘गोकुळ दूध संघाच्या’ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये महायुतीला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळचे विद्यमान चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा दारूण पराभव झाला आहे. याशिवाय गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि विश्वास नारायण पाटील यांसारख्या प्रमुख नेत्यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. मुश्रीफ यांनी स्वतः महायुतीचे नेतृत्व केले असल्यामुळे हा निकाल त्यांच्या राजकीय वर्चस्वासाठी मोठा फटका मानला जात आहे.
हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांना आत्मचिंतनाचे आवाहन
निवडणुकीच्या निकालानंतर संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना हसन मुश्रीफ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली. पराभवामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात निराश न होता आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पराभवाचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि पुढील राजकीय रणनीती आखण्यासाठी उद्या संध्याकाळी 5 वाजता एका विशेष आत्मचिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द पाळत महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
हेही वाचा – शिवसेनेच्या आमदाराचा सरकारलाच घरचा आहेर; ‘चेष्टा चालू आहे का?’, म्हणत सुनावले खडेबोर
महायुतीतील अंतर्गत वाद आणि उशिरा झालेली युती पराभवाचे प्रमुख कारण
या वेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी जनमताचा आदर करत पराभव मान्य केला. निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद आणि भांडणे सुरू होती, ज्यामुळे ऐनवेळी झालेली ही युती कदाचित दूध उत्पादक मतदारांना आवडली नसेल, अशी थेट कबुली त्यांनी दिली. गोकुळच्या एकूण 25 जागांसाठी झालेल्या या अत्यंत चुरशीच्या लढतीत समविचारी आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला, तर महायुतीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. पराभव झाला असला तरी कोल्हापुरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गोकुळच्या प्रगतीसाठी नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करत राहू, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.