Ashok Kharat Case: नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्येही उमटताना दिसत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.
"खरात प्रवृत्ती घाणेरडी, कोणाचीही गय करणार नाही" – प्रफुल पटेल
अशोक खरातच्या कृत्यांचा तीव्र निषेध करताना प्रफुल पटेल म्हणाले की, "भोंदूगिरीचे हे प्रकार अत्यंत खालच्या थराचे आणि घाणेरडे आहेत. खरातवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, पण जे कुणी त्याच्या या अघोरी कृत्यांमध्ये सहभागी आहेत, त्यांचीही गय केली जाणार नाही." पक्षातल्या ज्या नेत्यांची नावे या प्रकरणाशी जोडली जात आहेत, त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच योग्य ती पावले उचलेल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. पटेलांच्या या विधानामुळे चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुनील तटकरे यांचा संताप आणि टाळाटाळ
दुसरीकडे, रायगडमधील महाड येथे माध्यम प्रतिनिधींनी जेव्हा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत विचारले, तेव्हा ते चांगलेच संतप्त झाले. "ही या विषयावर बोलण्याची जागा नाही, मला जेव्हा बोलायचे आहे तेव्हा मी योग्य वेळी नक्की बोलेन," असे उत्तर देऊन त्यांनी या संवेदनशील विषयावर अधिक बोलणे टाळले. यामुळे पक्षात या विषयावरून मोठी अस्वस्थता असल्याचे स्पष्ट होत आहे.
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे पाद्यपूजेचे व्हिडिओ आणि विविध कार्यक्रमांतील फोटो समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर संयुक्त हल्ला चढवला आहे. सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि रुपाली पाटील-ठोंबरे या तिन्ही महिला नेत्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा उघडला आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षांचे अशा वादग्रस्त व्यक्तीसोबतचे संबंध हे नैतिकतेच्या चौकटीत बसत नसल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे.
काय आहे खरात प्रकरण?
मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेला आणि स्वतःला 'अंकशास्त्रज्ञ' म्हणवून घेणारा अशोक खरात याला नाशिक गुन्हे शाखेने 18 मार्च रोजी अटक केली. एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. खरात हा सिन्नरमधील एका मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून, त्याचे बड्या राजकीय नेत्यांशी असलेले संबंध आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत.