महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात एकच भूकंप झाला असून, आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत एका उच्चस्तरीय विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली असून, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याकडे या संपूर्ण तपासाची धुरा सोपवण्यात आली आहे.
ऑडिओ क्लिपमधील खळबळजनक दावे आणि एसआयटीची रचना
व्हायरल झालेल्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना थेट 500 कोटी रुपयांची ऑफर किंवा व्यवहार झाल्याचा अत्यंत गंभीर दावा करण्यात आला होता. या प्रकरणामागील खरा सूत्रधार कोण आहे, याचा पर्दाफाश करण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी जरांगे यांनी लावून धरली होती. याची गंभीर दखल घेत सरकारने तातडीने त्रिस्तरीय एसआयटी गठीत केली आहे. या विशेष पथकात अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे हे सदस्य म्हणून अत्यंत सखोल आणि तांत्रिक तपास करणार आहेत.
मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
दरम्यान, एसआयटीच्या स्थापनेनंतर आपली आक्रमक भूमिका स्पष्ट करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. केवळ एसआयटी गठीत करून ‘छक्के-पंजे’ खेळू नका, तर या कटाच्या खऱ्या मुळापर्यंत जाऊन सत्य बाहेर काढा, असे ते म्हणाले. ही ऑडिओ क्लिप कोणतीही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेली नसून ती 100 टक्के खरी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. एवढा मोठा आणि गुंतागुंतीचा संवाद एआयद्वारे तयार करणे अशक्य असल्याचे सांगत त्यांनी तांत्रिक बाजूवरही बोट ठेवले.
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना जरांगे यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. ही क्लिप अत्यंत विखारी मानसिकेतून तयार करण्यात आली असून याद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा कुटिल डाव होता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एसआयटी प्रमुख शैलेश बलकवडे हे एकेकाळी जालन्याचे पोलीस अधीक्षक राहिले असून ते जरी कार्यक्षम असले, तरी त्यांनी कोणत्याही दबावाविना पूर्णपणे निष्पक्ष तपास करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या प्रकरणाच्या खोलात गेल्यास शिंदे आणि फडणवीस यांच्यातील संबंधांचा गैरफायदा घेऊन मोठा राजकीय गेम खेळला जात असल्याचे उघड होईल, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा – ‘आरोपी क्रमांक 4 ला हटवल्यानंतर 30 सेकंदात आंदोलन संपेल…’; राहुल गांधींचे केंद्र सरकारला थेट आव्हान
संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र आणि भाजपचा पलटवार
या ऑडिओ बॉम्बमुळे राज्यभरात राजकीय कलगीतुरा तीव्र झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची सखोल चौकशी सक्तवसुली संचालनालयामार्फत (ED) किंवा इतर केंद्रीय यंत्रणांकडून करावी, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवले आहे. दुसरीकडे, भाजपने यावर तीव्र आक्षेप घेत ही ऑडिओ क्लिप पूर्णपणे ‘एआय जनरेटेड’ असल्याचा दावा केला आहे. तसेच यामागील खरी सूत्र सूत्रधार संजय राऊतच असून त्यांचीच कसून चौकशी झाली पाहिजे, असा पलटवार भाजपने केला आहे. आता एसआयटीच्या फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासातून नेमके काय बाहेर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.