राष्ट्रवादीत उभी फूट पडून दोन गट निर्माण झालेत. एक गट विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. तर दुसरा सत्तेत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, असा दावा काही नेत्यांकडून करण्यात येत होता. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीची एनडीएमधील समावेशाबाबतची चर्चा जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या थेट विधानाने विलिनीकरणाबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यांची बैठकही सिल्वर ओकवर पार पडल्याची बातमी समोर आली. पक्षाच्या बैठकीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, सरकारच्या निर्णयापासून ते विलीनीकरणावर भाष्य केले. यावेळी विलिनीकरणावर बोलताना शरद पवारांनी आम्ही कुठे जाणार नसल्याचे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने आता राज्यातील आगामी राजकारणाची दिशा अधिक स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले की, “विलीनीकरणाबाबतआमच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पण एक गोष्ट सांगतो की शरद पवार म्हणून माझ्या नेतृत्वातील राष्ट्रवादी सत्तेसोबत जाणार नाही. ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे, त्यांनी आमच्यासोबत विरोधी पक्षात यावं.” असं म्हणत शरद पवारांनी विलिनीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यापूर्वीही सत्ताधारी गटासोबत विलीनीकरणाची शक्यता फेटाळण्यात आली आहे. मध्यंतरी शरद पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करुन एनडीए आघाडीत सामील होतील, अशी जोरदार चर्चा होती. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होईल, अशीही वदंता होती. मात्र, शरद पवार यांनी या सर्व शक्यता पार धुडकावून लावल्या आहेत.
तर पुढे SIR वर बोलताना SIR प्रक्रियेवर शरद पवारांनी गंभीर सवाल उपस्थित केला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर निवडणुकीचे निकाल फिरवण्यासाठी होण्याची शक्यता असल्याचं पवारांचं वक्तव्य. पुढे बारामतीतील AI रोबोटचा संदर्भ देत पवारांनी AIच्या वापराबाबत भाष्य केलं. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये AI रोबोटने शरद पवारांचं स्वागत केल्याचा व्हिडिओ 23 सप्टेंबरला समोर आला होता.