नागपूर पदवीधर मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे प्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे (कराळे मास्तर) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे. पक्षाविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची पुढील 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कराळे मास्तर प्रचंड भावूक झाले आणि त्यांना ऑन कॅमेरा अश्रू अनावर झाले. स्वतःच्या कोचिंग क्लासकडे दुर्लक्ष करून पक्षाच्या प्रचारासाठी राज्यभरात तब्बल 110 पेक्षा जास्त जाहीर सभा घेतल्या, मात्र पक्षाने त्याची परतफेड हकालपट्टीने केली अशी खंत त्यांनी यावेळी अश्रूंना वाट करून देताना व्यक्त केली.
जनतेसाठी लढताना 100 हून अधिक गुन्हे
आपल्या भावनांना वाट करून देताना कराळे मास्तर म्हणाले की, सर्वसामान्यांच्या आणि तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देताना आजवर त्यांच्यावर 100 पेक्षा जास्त पोलीस केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. यात 2 अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले असून त्यांनी 8 दिवसांचा तुरुंगवासही भोगला आहे. एवढा मोठा संघर्ष करत असताना किंवा कारागृहात असताना पक्षातील एकाही वरिष्ठ नेत्याने आपली साधी विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आजही मनात तितकाच आदर असला, तरी स्थानिक नेत्यांनी केलेली ही कारवाई अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
हेही वाचा – ‘तेच माझे खरे नेते, त्यांचेच आदेश पाळणार…’; अभिजीत दीपकेंच्या पोस्टने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कारवाईमागे काँग्रेसचा दबाव असल्याचा संशय
या राजकीय कारवाईमागे काँग्रेस पक्षाचा थेट दबाव असण्याची शक्यता कराळे मास्तर यांनी वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मदत न करण्याची धमकी देऊन काँग्रेसनेच आपल्यावर कारवाई करण्यास भाग पाडले असा संशय त्यांनी व्यक्त केला. राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली असली तरी नागपूर पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित मतदार आणि जनता या अन्यायाविरुद्ध पाठीशी उभी राहील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्या होणाऱ्या मतदानातून जनताच योग्य उत्तर देईल आणि आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, अशी आशा त्यांनी शेवटी व्यक्त केली.