राहुल गांधींना न्यायालयाचा मोठा दिलासा; 8 वर्षांनंतर अमित शाह मानहानी प्रकरणातून निर्दोष मुक्तता

केंद्रीय गृहमंत्री आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात 2018 मध्ये केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीवरून हा खटला दाखल करण्यात आला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शुभम वर्मा यांनी राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना मोठा दिलासा दिला.
राहुल गांधींना न्यायालयाचा मोठा दिलासा; 8 वर्षांनंतर अमित शाह मानहानी प्रकरणातून निर्दोष मुक्तता
Rahul Gandhi acquitted

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील विशेष खासदार-आमदार (MP-MLA) न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मानहानीच्या एका जुन्या खटल्यातून पूर्णपणे निर्दोष मुक्त केले आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात 2018 मध्ये केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीवरून हा खटला दाखल करण्यात आला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शुभम वर्मा यांनी राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना मोठा दिलासा दिला. निकाल वाचनाच्या वेळी राहुल गांधी स्वतः न्यायालयात उपस्थित होते.

न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था

न्यायालयाने 26 ऑक्टोबर ही निकालाची अंतिम तारीख निश्चित केली होती आणि राहुल गांधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 11:00 च्या सुमारास राहुल गांधी सुलतानपूर न्यायालयात पोहोचले. त्यांच्या आगमनामुळे न्यायालय परिसरात पोलीस प्रशासनाकडून अत्यंत कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता होताच काँग्रेस पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर एकत्र येत मोठा जल्लोष साजरा केला. पक्षाने आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवरून “सत्यमेव जयते” अशी पोस्ट करत निर्णयाचे स्वागत केले.

नेमके काय होते प्रकरण?

भाजप नेते आणि जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. 8 मे 2018 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सोहराबुद्दीन शेख प्रकरणाचा संदर्भ देत भाजप अध्यक्षांवर टीका केली होती. तथापि, सोहराबुद्दीन प्रकरणात 2014 मध्येच न्यायालयाने अमित शाह यांची निर्दोष मुक्तता केली होती आणि सर्वोच्च न्यायालयानेही 2016 मध्ये पुनरावलोकन याचिका फेटाळली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्याने अमित शाह यांची बदनामी झाल्याचा दावा करत तक्रारदाराने खटला दाखल केला होता.

हेही वाचा –  राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! 5 गाड्या रुग्णवाहिकेला धडकल्या; जखमींमध्ये पक्ष कार्यकर्ते, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश

दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर राहुल गांधींची सुटका

या प्रकरणी न्यायालयाने 27 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल गांधी यांना समन्स बजावले होते, ज्यानंतर त्यांनी न्यायालयात हजर राहून जामीन मिळवला होता. पुढे तक्रारदाराने राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेण्याची मागणी केली होती, जी कनिष्ठ न्यायालय, सत्र न्यायालय आणि शेवटी अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी एकूण 4 वेळा न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले होते. अखेर सर्व बाजू आणि पुरावे विचारात घेत न्यायालयाने राहुल गांधी यांना सर्व आरोपांतून मुक्त केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version