Thane Crime: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवनवीन घडामोडी घडत असल्या तरी निकाल मात्र शून्यच असल्याचा दावा करत उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याआधी राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
नेमके काय घडले?
“माझ्या पप्पांना न्याय द्या,” अशी आर्त हाक मारणारा राम पूर्णेकर पोलिसांच्या चौकश्या आणि निकालातील विलंबाला कंटाळून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी धडकला होता. वडिलांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी तो दाखल झाला होता, मात्र आंदोलन सुरू करण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
राम पूर्णेकरला नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. तसेच याप्रकरणी पोलिसांसोबत चर्चा देखील करण्यात आली.
वारंवार पुरावे दाखवूनही पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी हा रोष व्यक्त केला. राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्यावर सुरुवातीपासून करण्यात आलेल्या आरोपांबाबत पोलिसांचा तपास असमाधानकारक असल्याने राम पूर्णेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेत त्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूक निकालासंबंधीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-
विधान परिषद मतदारसंघ निकाल | Maharashtra MLC Election Results
नौपाडा बाहेर रास्ता रोको
नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात राजन विचारे, अविनाश जाधव, केदार दिघे, मनोज प्रधान (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष) हे नेते सहभागी झाले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पोलिसांसोबतच्या चर्चेत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त आंदोलकांनी रास्ता रोकोचा पर्याय अवलंबला. नौपाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर जाणारा मुख्य हरिनिवास मार्ग रोखण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. परिणामी वाहतूक वळवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा यासाठी सर्व आंदोलक आक्रमक झाले आहेत. पुरावे आणि जबाब असूनही मूळ आरोपींना अटक होत नसल्याने पूर्णेकर कुटुंबीय संतप्त झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.