कर्जत येथील वादग्रस्त वृक्षतोडीचे समर्थन केल्याप्रकरणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. एका राजकीय पदासाठी किंवा खासदारकीसाठी निकम यांनी आपल्या प्रतिष्ठेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, असा प्रखर संताप राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना व्यक्त केला. पर्यावरणाचा घात करणाऱ्या प्रकल्पांचे समर्थन करणे म्हणजे थेट अजमल कसाबसारख्या नराधमाची बाजू घेण्यासारखेच आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.
उज्ज्वल निकमांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी
उज्ज्वल निकम यांच्याविषयी व्यक्तिगत पातळीवर आदराची भावना असल्याचे सांगत संजय राऊत यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेचा तीव्र निषेध केला. “निकम हे आमचे मित्र आहेत, परंतु ते एका खासदारकीच्या मोहात पडून अशा राक्षसी पक्षात गेले आहेत, हे राज्याचे दुर्दैव आहे,” असे ते म्हणाले. मुंबई हल्ल्याच्या खटल्यात अजमल कसाबविरोधात युक्तिवाद करताना मानवतावादाचा व कायद्याचा पाठपुरा करणारे निकम आज निसर्गाची हत्या करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत, यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “10 झाडे तोडणे म्हणजे एक कसाब तयार करण्यासारखेच आहे; आम्ही झाडांची विनाकारण होणारी कत्तल आणि कसाबचे कृत्य एकाच तागडीत तोलतो,” अशा शब्दांत राऊतांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.
विदर्भातील प्रकल्पांवरही बोट
केवळ कर्जतच नव्हे, तर विदर्भातील चंद्रपूर आणि छत्तीसगडच्या जंगलांमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जात असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. विदर्भासारख्या समृद्ध जंगलांवर आणि व्याघ्र प्रकल्पांवर कुऱ्हाड चालवली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याला विरोध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. “जर 5 हजार झाडे तोडून एखादा प्रकल्प उभा राहत असेल, तर अशा विकासाचा आणि अदानीसारख्या उद्योगपतींचा उपयोग नाही,” असे सांगत त्यांनी महाराष्ट्राला टाटा, बिर्ला आणि किर्लोस्कर यांच्यासारख्या राज्याचे वैभव वाढवणाऱ्या उद्योजकांची गरज असल्याचे स्पष्ट केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.