महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत जाहीर झालेल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस आणि मतभेद उघड झाले आहेत. 23 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि बंडखोरीमुळे महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमरावतीमुळे पुणे शिक्षक आणि संभाजीनगरमध्ये युतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
अमरावतीत भाजपचे बंडखोर उभे राहिल्याने पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहेत. तर, अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मदत केली तर संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना मदत करणार आहे. अमरावतीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट भाष्य केलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत कधीही महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये याची काळजी घेतली आहे. पुण्यामधून मंगेश चुटे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. महायुतीमध्ये काम करताना आपण एक घर पुढे गेलो पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. आपण आपापल्यामध्ये पाडापाडी सुरू केली तर आपली काँग्रेस होईल. हा उभा राहतो तो बंडखोर उभा राहतो, आणि सांगतात त्यांचा पक्षासोबत संबंध नाही असे कसे होऊ शकते. अमरावतीमध्ये शिक्षक मतदार संघ हा एकमेव मतदारसंघ आम्हाला सुटलेला आहे. तिथे राष्ट्रवादीच्या एकाने बंडखोरी केली, तो अजित दादाचा काही काळ पीए होता.”
“राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार त्या ठिकाणी त्याला पाठिंबा देऊन प्रचार करत आहेत. अशी भूमिका तुम्ही घेत असाल तर आम्हाला दुसरी भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही मराठवाडा पदवीधर मतदारसंघांमधून आमचे मित्र सतीश चव्हाण त्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आज उदय सामंत यांना अमरावतीमध्ये पाठवले आहे. तिथे जाऊन अजून परिस्थिती बघण्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या त्या उमेदवाराला समजावून सांगण्याचे सांगितले आहे. आम्हाला अमरावतीत पाठिंबा दिला नाही तर या ठिकाणचा पाठिंबा आम्ही काढून घेऊ. आमचे हे धोरण कायम राहील. आज तिथे सकारात्मक चर्चा झाली तर उदय सामंत आणि तेथील उमेदवाराची पत्रकार परिषद होईल. आताच्या घडीला पदवीधरमध्ये आमचा पाठिंबा नाही हे आम्ही जाहीर केले आहे.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.