देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील भूमिकेनंतर सीजेपीचे (CJP) सहसंयोजक सौरभ दास यांनी आता थेट न्यायव्यवस्था आणि न्यायाधीशांवर अत्यंत गंभीर आणि आक्रमक आरोप केले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा न्यायपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, काही न्यायाधीशांनी देशाशी प्रतारणा केल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
न्यायाधीशांवर देशद्रोहाचे आणि संविधानाशी प्रतारणेचे गंभीर आरोप
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘अकाउंटॅबिलिटी ऑफ जजेज ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट’ या आगामी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सौरभ दास यांनी सोशल मीडियाद्वारे जोरदार हल्लाबोल केला आहे. न्यायमूर्तींच्या उत्तरदायित्वाचा हा काळ असल्याचे सांगत, दुर्दैवाने अनेक न्यायाधीशांनी देशाला धोका दिला असून संविधानाशी थेट फ्रॉड केला आहे, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. योग्य वेळी या सर्वांची उत्तरदायित्वा निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एस. ओका, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि वकील प्रशांत भूषण मार्गदर्शन करणार असून, नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
न्यायपालिकेवर टीका करण्याची सौरभ दास यांची जुनी पार्श्वभूमी
सौरभ दास यांनी न्यायव्यवस्था आणि न्यायाधीशांवर आक्रमक टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्यावर त्यांनी कथित मद्य घोटाळ्याच्या सुनावणीदरम्यान गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे त्यांना मानहानीच्या कायदेशीर खटल्याला सामोरे जावे लागले होते. तसेच, एसआयआर (SIR) प्रक्रियेतील कथित त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवरही उघडपणे दोषारोप केले होते. त्यांच्या या सततच्या भूमिकेमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
हेही वाचा – राहुल गांधींना न्यायालयाचा मोठा दिलासा; 8 वर्षांनंतर अमित शाह मानहानी प्रकरणातून निर्दोष मुक्तता
माजी सरन्यायाधीशांच्या कार्यशैलीवरही उपस्थित केले प्रश्न
या वादाच्या पार्श्वभूमीवर सौरभ दास यांनी माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायिक नियुक्ती आणि कार्यशैलीवर भाष्य करणारा आपला एक जुना लेख पुन्हा शेअर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी माजी सरन्यायाधीशांच्या कार्यकाळात सरकारप्रती गरजेपेक्षा जास्त नम्रता दाखवली गेल्याचे निरीक्षण नोंदवले होते. याच मुद्द्याचा आधार घेत सौरभ दास यांनी तो लेख वाचण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. एका बाजूला निवडणूक आयोगावरील सुनावणी आणि दुसऱ्या बाजूला न्यायव्यवस्था व न्यायमूर्तींच्या भूमिकेवर वारंवार होत असलेल्या या आक्रमक हल्ल्यांमुळे देशातील कायदेशीर आणि राजकीय वातावरण तापले असून, यावर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.