पुणे : शिवसेनेकडून पुणे शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी सचिन सानप यांची शिवसेना पक्षाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून सचिन सानप हे आता शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. सचिन सानप यांनी जरी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी मात्र शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालयाकडून आता शिवसेना अधिकृत उमेदवार म्हणून पत्रक जारी करण्यात आले आहे. याबाबत सचिन सानप यांनी माहितील दिली.
हेही वाचा : “…तर आपला काँग्रेस होईल” पदवीधर मतदार संघावरून संजय शिरसाट यांच वक्तव्य चर्चेत
प्राध्यापक सचिन सानप केवळ एक राजकीय चेहरा नसून, त्यांच्याकडे शिक्षण आणि प्रशासनाचा गाढा अनुभव आहे. ते पुण्यातील नामांकित नवरोजी वाडिया महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. केले असून, सध्या त्यांची पीएचडीचे संशोधन सुरू आहे. याशिवाय, पुण्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘मॉडर्न एज्युकेशन सोसायटी’चे विश्वस्त म्हणूनही ते महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. केवळ शैक्षणिक क्षेत्रच नव्हे, तर प्रशासकीय पातळीवरही त्यांचा दांडगा वावर राहिला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून त्यांनी काम पाहिले असून, मंत्रालयाचे कामकाज, शासकीय धोरणे आणि फाईल्सचा प्रवास त्यांना अतिशय जवळून माहीत आहे.