Sunday, November 16, 2025 11:45:40 PM

Shrikant Shinde: उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरुन श्रीकांत शिंदेंची जोरदार टीका

उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरला भेट देणार आहेत. त्याआधीच आज शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन टीका केली.

shrikant shinde उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरुन श्रीकांत शिंदेंची जोरदार टीका

मुंबई: राज्य सरकारने अतिवृष्टीनंतर  31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत जमा देखील झाली. परंतु, काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारची मदत अपुरी असल्याचे सांगत महायुतीवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकारला 'दगाबाज रे..' म्हणत आजपासून सलग 4 दिवसांचा मराठवाडा दौरा सुरू केला आहे. त्यामध्ये, ते छत्रपती संभाजीनगरलाही भेट देणार आहेत. त्याआधीच आज शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन टीका केली.

मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना पुन्हा उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते संवाद साधणार आहेत. सरकारने दिलेल्या पॅकेजचे काय झालं? शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली किती रक्कम शेतकऱ्यांपर्यंत खरंच पोहोचली का? 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या हातात महिनाभरानंतर किती पैसे आले? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहेत. याबाबतीत खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.

हेही वाचा: Government Scheme: KCC मच्छिमारांसाठी शासनाचा मोठा दिलासा! 2 लाखांपर्यंतच्या भांडवली कर्जावर 4 टक्के व्याज सवलत मंजूर

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, "हे जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? ओला दुष्काळ झाला, तेव्हा 36 हजार रुपयांचे पॅकेज या सरकारने दिले. याआधी देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून मदत देण्याचं काम आमच्या सरकारनेच केलं. ज्यांनी काहीच केलं नाही ते आज शेतकऱ्यांना येऊन बोलत आहेत, त्यांना बोलू द्या. शेतकऱ्यांना माहिती आहे, त्यांच्याबरोबर कोण उभे आहे."

पुढे बोलताना, शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला त्यामुळे विधानसभेला शेतकरी आमच्या मागे उभे राहिले. म्हणून महायुती सरकार पुन्हा निवडून आले. या दौऱ्याबद्दल काय म्हणायचं हे त्यांना विचारा. शेतकऱ्यांची फसवणूक केली ही उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली, तीच रटाळ कॅसेट, तेच टेप लोकांना दररोज ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

ठाकरेंचा दौरा निवडणुकीसाठी
मराठवाड्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. महायुती सरकारने मदत ही केली, उद्धव साहेबांचा हा दौरा निवडणुकीसाठी आहे. त्यांचा दौरा आला की निवडणुका लागल्या म्हणायच्या. याआधी लोकसभेला नंतर विधानसभेलाही त्यांनी असंच केलं. ते आम्हाला दगाबाज म्हणू शकतात. पण, शेतकऱ्याला आम्ही मदत केली आहे, थोडा उशीर झाला पण मदत मिळाली, असे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे.


सम्बन्धित सामग्री