मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 'ठाकरे बंधू' एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या ऐतिहासिक युतीची पहिली ठिणगी जागावाटपावरून पडली असून, मनसेचा एक निष्ठावान मोहरा चक्क 'नॉट रिचेबल' झाल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये युतीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी, पहिल्याच वळणावर मनसेच्या माजी नगरसेवकाची नाराजी राज ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
या वादाचे मुख्य केंद्र ठरले आहे ते म्हणजे प्रभागांचे अदलाबदल. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 192 आणि 194 या जागांवरून दोन्ही पक्षांत पेच निर्माण झाला होता. अखेर यावर तोडगा काढत 192 हा वॉर्ड मनसेकडे, तर 194 हा ठाकरेंच्या शिवसेनेला (UBT) सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, याच निर्णयात माजी नगरसेवक संतोष धुरी यांचा पत्ता कट झाल्याचे चित्र निर्माण झाले. धुरी हे वॉर्ड 194 मधून लढण्यासाठी इच्छुक होते, पण ही जागा शिवसेनेला सुटल्याने त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला खीळ बसली आहे. यामुळे संतापलेले धुरी अचानक नॉटरिचेबल झाल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
संतोष धुरी यांची नाराजी ही केवळ वैयक्तिक नसून, ती युतीच्या सुरुवातीलाच लागलेले 'बंडखोरी'चे ग्रहण मानले जात आहे. ही बाब गांभीर्याने घेत मनसेचे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांनी तातडीने धावपळ सुरू केली आहे. धुरी यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना आज सकाळी साडे दहा वाजता राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्था'वर पाचारण करण्यात आले आहे. या भेटीत धुरी यांचे राजकीय पुनर्वसन कसे करायचे, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेने वॉर्ड 192 मधून यशवंत किल्लेदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या शहरांमध्येही ठाकरे बंधू 'महायुती' आणि 'महाविकास आघाडी'च्या विरोधात तिसरी ताकद म्हणून उभे राहण्याच्या तयारीत आहेत. पुण्यात तर या समीकरणात काँग्रेसलाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, संतोष धुरी यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची नाराजी मनसेला मुंबईत महागात पडू शकते.
विश्लेषकांच्या मते, ठाकरे बंधूंची युती ही भावनिक स्तरावर शिवसैनिकांना एकत्र आणणारी असली तरी, जमिनीवर जागावाटपाचा हा पेच सोडवणे नेत्यांसाठी मोठे आव्हान असणार आहे. एका नेत्याची नाराजी ही भविष्यातील मोठ्या बंडाची नांदी ठरू नये, यासाठी आता 'शिवतीर्थ' सक्रिय झाले आहे. संतोष धुरी शिवतीर्थावर येणार का आणि आल्यास त्यांचे समाधान होणार का? याकडे आता अवघ्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.