अमर पाटील, प्रतिनिधी
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या 25 संचालकपदांच्या जागांसाठी आज, सोमवारी, 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर मतमोजणीसाठीदेखील कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून 32 टेबलांवर होणार मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक 2026-2031 ची मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि कडेकोट बंदोबस्तात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोकुळ संघाच्या निवडणुकीत संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी 50 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून 20 सदस्य निवडून द्यावयाचे असून, त्यासाठी 40 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार उमेदवार, इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, तर अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.
या निवडणुकीसाठी पाच स्वतंत्र मतपत्रिका वापरण्यात आल्या असून, सर्वसाधारण मतदारसंघासाठी पांढरा, महिला प्रतिनिधींसाठी गुलाबी, इतर मागास प्रवर्गासाठी फिकट हिरवा, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गासाठी फिकट पिवळा आणि अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधींसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका निश्चित करण्यात आली आहे. पाच मतपत्रिकांमुळे मतमोजणी प्रक्रिया काळजीपूर्वक व नियमांनुसार पार पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी गोकुळ दुध संघाची निवडणूक जिल्ह्यासाठी संवेदनशील असून यामध्ये कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यस्थेला बाधा येणार नाही याप्रमाणे नियोजन केले आहे. मतमोजणीसाठी 32 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 32 मतमोजणी पर्यवेक्षक, 64 मतमोजणी सहाय्यक आणि पाच शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, विजयानंतर मिरवणुकांना बंदी घालण्यात आल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.