किशोर पगारे, उल्हासनगर: उल्हासनगरमधील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमधील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महापालिकेतील राजकीय घडामोडी आणि नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कमलेश निकम यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून हा वाद अधिक तीव्र झाल्याचे समोर आले आहे. निकम यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप पदाधिकारी प्रशांत माळी आणि महेंद्र मिरजकर यांनी कल्याणमधील बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांनुसार, कमलेश निकम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या संपूर्ण वादाला उल्हासनगर महापालिकेतील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आधीपासूनच मतभेद सुरू आहेत. सभागृहातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांनंतर हा संघर्ष सोशल मीडिया आणि पोलिस तक्रारींपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वीही दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कमलेश निकम यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. सोशल मीडियावरील वक्तव्यांनंतर वातावरण आणखी तापले होते. त्यानंतर दोन्ही गटांमधील राजकीय संघर्षाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले.
आता कमलेश निकम यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीमुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तक्रारीतील आरोपांवर पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची पडताळणी आणि आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.