विजय चिडे, तेजस होमतुरे, सुरेंद्र आकोडे / प्रतिनिधी
संभाजीनगर/नागपूर/अमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज, 23 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. या निवडणुकीत 182 उमेदवार रिंगणार असून पाच मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा), पुणे या मतदारसंघात आज मतदान होत आहे. आज, शुक्रवार सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी स्तरावरून मतदान पथकांना निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य देण्यात आले आहे. सर्व पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतपात्रिका वैध ठरावी, या उद्देशाने निवडणूक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संभाजीनगरमध्ये प्रथमच ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगणार
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये प्रथमच ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगणार असून महायुतीत भाजपची माघार, महाविकास आघाडीत उद्धवसेनेचे बंड पाहायला मिळाले. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. प्रतापसिंह पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्यात थेट लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. यंदा उबाठाचे दिलीप घुगेही निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत विभागातील ८४२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ३.२६ लाख मतदार ४१ उमेदवारांतून आज ‘पदवीधर’चा आमदार निवडणार आहेत. यंदा निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार असून, विभागातील तब्बल ३ लाख २६ हजार ७०९ पदवीधर मतदार उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखावा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
नागपूरमध्ये तिरंगी लढत
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीच्या रिंगणात ३८ उमेदवार असून, २ लाख ५५ हजार ६०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काँग्रेसचे अभिजित वंजारी, भाजपचे सुधाकर कोहळे आणि नितेश कराळे यांच्यात प्रमुख तिरंगी लढत होणार आहे. विभागातील सहा जिल्ह्यांत ४४५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. तर निवडणुकीसाठी २ हजार ५३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शांततेत मतदान पार पडावे, यासाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये भाजपला काँग्रेस, ठाकरे गटाचं आव्हान
अमरावती शिक्षक मतदारसंघ महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक हे उमेदवार आहे. महायुतीतील ४ उमेदवार बंडखोरीवर कायम आहेत. तीन बंडखोर भाजपचे एक शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार आहेत.
महायुतीतील या ४ उमेदवार बंडखोरी –
१. संगीता सचिन्द्र शिंदे-बोडे (भाजप खासदार अनिल बंडे यांच्या भगिनी)
२. शेखर भोयर (भाजप, आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे.)
३. श्रीकांत देशपांडे माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी
४. सुमित पवार, भाजप पदाधिकारी
महाविकास आघाडीचे उमेदवार-
१. अदिती ऋषिकेश पोहरे (काँग्रेस)
२. दत्तात्रय लहाने (उद्धव ठाकरे गट)
दिलीप कडू हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत.
एकूण मतदार – 35810
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रांवर २४ हजार ७३२ पुरुष तर ११ हजार ७८ महिला असे एकूण ३५ हजार ८१०शिक्षक मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्हानिहाय एकूण मतदारांची संख्या –
अमरावती – १०,०९७,
अकोला – ५,९४२,
बुलढाणा – ९,१२४,
वाशिम – ३,७१५
यवतमाळ – ६,९३२
सर्वाधिक मतदान अमरावती जिल्ह्यात आहेत.
जिल्हानिहाय एकूण मतदान केंद्रांची संख्या –
अमरावती – २५,
अकोला – १३,
बुलढाणा – १८,
वाशिम – ७
यवतमाळ – १८
अमरावती शिक्षक मतदारसंघ विभागात –
एकूण ८१ केंद्र
एकूण जिल्हे पाच –
अमरावती, अकोला, बुलढाणा ,वाशिम, यवतमाळ,
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.