विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आवडते शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख केला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शहरातील 22 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. केवळ 6 नगरसेवक उद्धव ठाकरे गटात आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचा बाल्लेकिल्ला टिकवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असेल. यामुळे, 'आता राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युती होईल', अशी शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीत मनसे युतीबाबत स्थानिक वातावरण तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शिवसेनेचे दोन्ही कार्यकर्ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने, स्थानिक पातळीवर हिंदुत्वाची 'व्होट बँक' एकसंध राहील की नाही हे या निवडणुकीत दिसून येईल.
सागर खर्गेंची प्रतिक्रिया:
छत्रपती संभाजीनगर येथील ठाकरे गटाचे शहरप्रमुख सागर खर्गे म्हणाले की, 'शिवसेना-मनसे युतीसाठी सध्या चर्चा सुरू आहे आणि जर अशी युती झाली तर जिल्ह्यातील राजकारणही वेगळे वळण घेईल. त्याचा परिणाम महायुतीवर होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीच्या अडचणी वाढू शकतात आणि त्यांना मोठा धक्का बसू शकतो. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठे यश मिळवत आहेत, तर उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अपयशाला सामोरे जावे लागले. विधानसभा आणि लोकसभा दोन्ही ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे खाते उघडले नाही. मात्र, आता महापालिका चर्चेत असल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने आणि शिवसेना पक्षाने जोमाने काम करण्यास सुरू केले आहे.'
हेही वाचा: 'मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं?'; आदित्य ठाकरेंचा सवाल
काय म्हणाले चंदू नवपुते?
'छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा कस लागणार आहे. दोन्ही शिवसेना पक्षांचे कार्यकर्ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने, स्थानिक पातळीवर हिंदुत्वाची 'व्होट बँक' एकसंध राहील की नाही, हे या निवडणुकीत समजेल. हिंदुत्वाच्या वादग्रस्त मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येतील अशी चर्चा सर्वत्र आहे. 'खरंच हे दोन्ही नेते एकत्र येणार का?', याकडे सर्वांचे लक्ष आहे. जर ठाकरे बंधूंची युती झाली तर हिंदुत्ववादी व्होट बँक ही ठाकरेंच्या पाड्यात पडण्याची शक्यता आहे', अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर येथील मध्यविधानसभा अध्यक्ष चंदू नवपुते यांनी दिली आहे.
हेही वाचा: 'या' कारणामुळे शाहरुख खानच्या 'मन्नत'साठी सरकार देणार 9 कोटी रुपये
या वर्षीच्या महानगरपालिका निवडणुकांच्या केंद्रस्थानी असलेल्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया:
1 - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, अपुऱ्या निधीमुळे योजना रखडल्या आहेत.
2 - योजनांचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत: विविध शासकीय योजनांचे फायदे मिळत नव्हते. जि.प. आणि पंचायत समिती बरखास्त झाल्यामुळे योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत.
3 - वाहतूक कोंडी: सिल्लोडसह कन्नड, पैठण आणि गंगापूर शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे आणि गेल्या दहा वर्षांत ही समस्या सोडवलेली नाही.
4 - प्रमुख रस्त्यांची दुर्दशा: शहरांना गावांना जोडणारे प्रमुख रस्ते निधीअभावी खराब अवस्थेत आहेत. आता याला गती मिळेल.