मुंबई: आयपीएलमधील भारतीय मालकीच्या संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना दूर ठेवण्याचा जो ‘अलिखित नियम’ पाळला आहे, त्याला छेद देण्याचा प्रयत्न काव्या मारनच्या सनरायजर्स लीड्सला चांगलाच भोवताना दिसत आहे. सनरायझर्स ग्रुपच्या मालकीच्या ‘सनरायझर्स लीड्स’ने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदवर 1,90,000 पाउंड (सुमारे 2.3 कोटी रुपये) या मोठ्या रकमेची बोली लावून त्याला संघात सामील केले होते.
हा निर्णय व्यावसायिक दृष्टीने योग्य वाटत असला तरी, सोशल मीडियावर एका मोठ्या वादाला निमंत्रण देऊन गेला. या एका खरेदीने केवळ काव्या मारनच्या फ्रँचायझीला वादाच्या भोवऱ्यात ढकलले नाही, तर क्रिकेटच्या जगातील कथित ‘अघोषित नियम’ आणि वास्तव यातील दरीही अधोरेखित केली.
लिलावात अबरार अहमदला विकत घेतल्यापासूनच सोशल मीडियावर टीकेची झोड उठली. ही टीका शमण्यापूर्वीच, गुरुवारी रात्री सनरायझर्स लीड्सचे अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाउंट अचानक निलंबित झाले. ‘X’ च्या धोरणांचे उल्लंघन केल्याचे कारण देत हे खाते बंद करण्यात आले असले तरी, नेमकी चूक काय होती, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. एका बाजूला अबरारची खरेदी आणि दुसऱ्या बाजूला अकाऊंटवर झालेली कारवाई, या दुहेरी संकटाने सनरायझर्सच्या व्यवस्थापनासमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे.
या वादाच्या मुळाशी आयपीएलमधील भारतीय संघांच्या धोरणांचा संदर्भ आहे. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना बंदी असल्याने, ‘द हंड्रेड’ लीगमध्ये भारतीय मालकीच्या फ्रँचायझी पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करतील का, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. याआधी काही माध्यमांतून अशा बातम्या आल्या होत्या की, हे संघ पाकिस्तानी खेळाडूंपासून दूर राहतील. मात्र, लिलावात चित्र वेगळे दिसले. ईसीबीने हस्तक्षेप करत ‘खेळाडूची निवड ही केवळ त्याच्या प्रतिभेवर आधारित असेल, राष्ट्रीयत्वावर नाही,’ असे स्पष्टीकरण दिले होते, तरीही या लिलावाने चाहत्यांच्या भावनांना स्पर्श केला आहे.
Sunrisers Leeds after signing Pakistani Player Abrar Ahmed for The Hundred league. – Hope Kavya Maran will release that Player from their squad. pic.twitter.com/TqSXmgeu2X — Anant (@ImAnant_45) March 13, 2026
आकडेवारीवर नजर टाकल्यास, लिलावात 13 पाकिस्तानी खेळाडू सहभागी झाले होते. अबरार अहमदला सनरायझर्स लीड्सने, तर उस्मान तारिकला बर्मिंगहॅम फिनिक्सने विकत घेतले. दरम्यान या बाबी हे क्रिकेटमधील वाढत्या ध्रुवीकरणाचे लक्षण आहे का? असा प्रश्न आता क्रीडा विश्लेषक उपस्थित करत आहेत.
काव्या मारनच्या नेतृत्वाखालील या संघाने व्यावसायिक निर्णय म्हणून अबरारची निवड केली असली तरी, सोशल मीडियावरील ही ‘डिजिटल बंदी’ तिच्या प्रतिमा संवर्धनासाठी एक मोठी अडचण ठरणार आहे. जेव्हा मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील वाद जास्त चर्चेत येतात, तेव्हा खेळ गौण ठरतो. सनरायझर्स लीड्सने आता या वादातून सावरून पुन्हा एकदा खेळावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अन्यथा, हा ‘वाद’ संघाच्या भविष्यातील कामगिरीवरही सावट टाकू शकतो.