Test Twenty Mixed Gender Cricket Tournament: क्रिकेटच्या इतिहासात आजवर महिला आणि पुरुषांचे सामने नेहमीच स्वतंत्रपणे आयोजित केले गेले आहेत. मात्र, आता हा पारंपरिक पायंडा मोडून महिला आणि पुरुष खेळाडू पहिल्यांदाच एकाच संघातून एकत्र मैदानावरावर उतरताना दिसणार आहेत. ‘टेस्ट ट्वेन्टी’ (Test Twenty) असे नाव देण्यात आलेल्या या 80 षटकांच्या मिक्स्ड जेंडर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेतील कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान केले जाणार आहे. या अनोख्या आणि ऐतिहासिक उपक्रमामुळे जागतिक क्रिकेट विश्वात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
जगभरातील 160 युवा खेळाडूंचा सहभाग; चार खंडीय संघांमध्ये रंगणार लढत
या स्पर्धेत 13 ते 21 वयोगटातील एकूण 160 युवा महिला व पुरुष क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.
– जगभरातून निवडलेल्या या खेळाडूंची प्रत्येकी 40 सदस्यांच्या 4 खंडीय संघांमध्ये विभागणी केली जाईल.
– प्रत्येक संघात 20 मुली आणि 20 मुलांचा समावेश असेल.
– या स्पर्धेची खास गोष्ट म्हणजे एकाच सामन्यात लाल आणि पांढऱ्या अशा दोन्ही चेंडूंचा वापर केला जाणार आहे.
– पहिला 40 षटकांचा खेळ दिवसा पांढऱ्या कपड्यांमध्ये लाल चेंडूने होईल, तर उर्वरित 40 षटकांचा खेळ रात्री फ्लडलाइट्सच्या प्रकाशात रंगीत कपड्यांमध्ये पांढऱ्या चेंडूने खेळवला जाईल. एकाच दिवसात हा सामना खेळवला जाईल.
‘टेस्ट ट्वेन्टी’ स्पर्धेचे मुख्य व अनोखे नियम:
दोन सत्रांमधील फलंदाजी: प्रत्येक संघाला दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळेल आणि पहिल्या 40 षटकांतील धावा दुसऱ्या सत्रातही कायम राहतील.
पॅरिटी नियम (Parity Rule): फ्लडलाइट्सच्या प्रकाशात मुलींनी केलेल्या धावांवर मुलांचा विजय ठरेल, तर मुलांनी केलेल्या धावा मुलींच्या विजयाचे भवितव्य ठरवतील.
– धावांचे एकत्र गणित: मुली आणि मुलांनी केलेल्या सर्व धावा एकत्र मोजूनच सामन्याचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
– समान ब्रॉडकास्ट वेळ: सामन्याच्या थेट प्रसारणातही मुला-मुलींना पूर्णपणे समान स्क्रीन टाइम (Screen Time) दिला जाईल.
दिग्गज क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन; समानतेचा संदेश देणारा क्रांतिकारी उपक्रम
या क्रांतिकारी स्पर्धेचे संस्थापक गौरव बहिरवानी यांनी लिंग-समानतेचे (Gender Equality) तत्त्व डोळ्यांसमोर ठेवून या ‘पॅरिटी नियमांची’ आखणी केली आहे. या स्पर्धेच्या सल्लागार मंडळात एबी डिव्हिलियर्स, मॅथ्यू हेड हेडन आणि सर क्लाइव्ह लॉयड यांसारख्या जागतिक क्रिकेट जगतातील दिग्गज दिग्गजांचा समावेश आहे. याशिवाय, दिल्लीचे प्रसिद्ध प्रशिक्षक राजकुमार शर्मा हे जागतिक निवड समितीचे अध्यक्षपद भूषवणार असून मायकल फोर्डहॅम यांच्याकडे स्पर्धेच्या आयोजनाची मुख्य धुरा असणार आहे.
हेही वाचा – IPL 2027 मिनी-ऑक्शनची तारीख ठरली! ‘या’ तारखेला गोव्यात लागणार खेळाडूंची बोली
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.