मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची निवड केल्याची बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन सांगितले. आधी राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या वीस - वीस षटकांच्या विश्वचषक स्पर्धेपर्यंतच द्रविडचा बीसीसीआयसोबत प्रशिक्षकपदाचा करार होता. हा करार संपला. आधीच या कराराला मुदतवाढ मिळाली होती. यामुळे आता हा करार वाढणार नाही हे निश्चित होते. नव्या प्रशिक्षकासाठी अनेक नावं चर्चेत होती. अखेर गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपरजायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स या तीन संघांना वेगवेगळ्या कालावधीत गौतम गंभीरने मार्गदर्शन केले आहे. आता गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. जय शाह यांनी गंभीरकडे सोपवलेली जबाबदारी जाहीर केली. यानंतर गौतम गंभीर याची एक्स पोस्ट आली. या पोस्टद्वारे गंभीरने भारतीय क्रिकेटप्रेमींच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले. गौतम गंभीर भारतासाठी २००७ आणि २०११ मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत खेळला होती. दोन्ही स्पर्धेवेळी गंभीरने उत्तम खेळी केली होती.