रणजी करंडक स्पर्धेच्या चालू हंगामाच्या सुरुवातीलाच मुंबई क्रिकेट संघाला एक अत्यंत मोठा धक्का बसला आहे. मुंबई संघाचा नव्याने नियुक्त उपकर्णधार आणि युवा फलंदाज आयुष म्हात्रे याच्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगची (मांड्यांच्या मागील स्नायूंची) जुनी दुखापत पुन्हा बळावल्यामुळे त्याला क्रिकेटपासून किमान एक महिना दूर राहावे लागणार आहे. परिणामी, तो रणजी करंडकाच्या पहिल्या टप्प्यातील उर्वरित तीन महत्त्वाच्या सामन्यांना मुकणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईने चंदीगडचा एक डाव आणि 155 धावांनी दणदणीत पराभव केला होता, मात्र उपकर्णधाराच्या दुखापतीमुळे संघाची चिंता वाढली आहे.
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना झाली होती पहिली दुखापत
काही दिवसांपूर्वीच निवडकर्त्यांनी 19 वर्षीय आयुष म्हात्रेची रणजी करंडक संघाचा उपकर्णधार म्हणून निवड केली होती. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळताना त्याच्या पाठीला आणि हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आयपीएल 2026 च्या उत्तरार्धाला मुकला होता. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी त्याला जवळपास पाच महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. यापूर्वी जून महिन्यातील मुंबईची स्थानिक टी-20 स्पर्धा, ऑगस्टमध्ये झालेला इंडिया ‘अ’चा श्रीलंका दौरा आणि मानाची दुलीप ट्रॉफी यांसारख्या मोठ्या स्पर्धांनाही त्याला या दुखापतीमुळे मुकावे लागले होते.
पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणाला मुकला
वानखेडे स्टेडियमवर चंदीगडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात आयुष म्हात्रेने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत 48 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याची जुनी दुखापत पुन्हा उफाळून आली. सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तो उपचारांमुळे क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरू शकला नाही. 12 ऑक्टोबर रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे स्कॅन करण्यात आले, तेव्हा दुखापत बरीच गंभीर असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या अनुपस्थितीत सुवेद पारकरला बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदान उतरवण्यात आले होते.
हेही वाचा – अर्जुन तेंडुलकरला मोठा धक्का! रणजी ट्रॉफी 2026-27 साठी गोव्याच्या संघातून बाहेर; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
अंगकृष रघुवंशीला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी?
आयुष म्हात्रेने यापूर्वी बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मध्ये आपल्या दुखापतीवर कठीण पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) पूर्ण केले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वैद्यकीय पथकाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने कांगा लीग सामन्यात ‘साईनाथ क्रिकेट क्लब’चे प्रतिनिधित्व करत रणजी संघात दमदार पुनरागमन केले होते. परंतु, आता पुन्हा दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर विश्रांतीची वेळ आली आहे. म्हात्रेच्या या अनुपस्थितीत, कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळणारा 22 वर्षीय प्रतिभावान सलामीवीर अंगकृष रघुवंशी याला हिमाचल प्रदेशविरुद्ध आगामी 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान बिलासपूर येथे होणाऱ्या सामन्यात मुंबईच्या संघात अंतिम 11 जणांमध्ये खेळण्याची मोठी संधी मिळू शकते.