पाकिस्तानची चांगलीच जिरवली! भारतात खेळण्यास नकार; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतून हकालपट्टी

पाकिस्तानच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेतील राजकीय तणाव कमी झाला असला तरी आशियातील इतर बलाढ्य संघांचे आव्हान भारतासमोर असणार आहे.
Hockey Pakistan
Hockey Pakistan

Pakistan Hockey team removed from Asian Champions Trophy: भारत सरकारच्या यजमानपदाखाली 27 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबरदरम्यान पंजाबमधील जालंधर आणि मोहाली येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे (Asian Champions Trophy 2026) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुरुवातीला पाकिस्तानच्या संघाचाही समावेश होता. मात्र, पाकिस्तान हॉकी महासंघाने भारतात येऊन खेळण्यास स्पष्ट नकार देत ही स्पर्धा कोणत्याही तटस्थ ठिकाणी (Neutral Venue) आयोजित करण्याची मागणी केली होती. आशियाई हॉकी महासंघाने (AHF) पाकिस्तानची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावत थेट त्यांना स्पर्धेतूनच बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

पंजाबमध्ये दोन दशकांनंतर आंतरराष्ट्रीय हॉकीचे पुनरागमन; बांगलादेशचा संघात प्रवेश
पाकिस्तानची हकालपट्टी झाल्यानंतर राखीव यादीत असलेल्या संघांपैकी बांगलादेशच्या हॉकी संघाला या मुख्य स्पर्धेत सहावा संघ म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आता या स्पर्धेत यजमान भारताव्यतिरिक्त जपान, चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि बांगलादेश हे 6 देश आमनेसामने येतील. पंजाबमध्ये तब्बल दोन दशकांनंतर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने हॉकीचे पुनरागमन होत आहे. पाकिस्तानने यापूर्वी 2023 च्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा दौरा केला होता, ज्यामध्ये ते 5 व्या स्थानावर राहिले होते.

हेही वाचा – मोठी बातमी! 17 सदस्यीय संघातून वैभव सूर्यवंशीला वगळलं, नवीन मुख्य प्रशिक्षकाचीही घोषणा

एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारतीय संघ सज्ज
नुकत्याच पार पडलेल्या एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मध्ये सुवर्णपदक पटकावून 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित करणारा भारतीय हॉकी संघ आता या घरच्या मैदानावरील स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 4 वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन (Craig Fulton) यांनी सांगितले की, एशियन गेम्समधील यश ही भूतकाळातील गोष्ट झाली असून आता आमचे संपूर्ण लक्ष या आगामी स्पर्धेत तीच विजयी लय कायम ठेवण्यावर केंद्रित आहे.

भारताचे लक्ष सलग विजेतेपदावर
घरच्या मैदानावर आणि स्थानिक पाठीराख्यांच्या उपस्थितीत खेळताना भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. पाकिस्तानच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेतील राजकीय तणाव कमी झाला असला तरी आशियातील इतर बलाढ्य संघांचे आव्हान भारतासमोर असणार आहे. जालंधर आणि मोहाली येथील क्रीडारसिकांमध्ये या आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा; सौरव गांगुली यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version