‘आम्हाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही…’; भाजप आमदार प्रशांत बंब यांचा आनंद परांजपेंना टोला

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भारतीय जनता पक्षाला आत्मचिंतन करण्याचा आणि महायुतीत समन्वय राखण्याचा सल्ला दिला होता.

‘आम्हाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही…’; भाजप आमदार प्रशांत बंब यांचा आनंद परांजपेंना टोला
Prashant Bamb, Anand Paranjape controversy

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भारतीय जनता पक्षाला आत्मचिंतन करण्याचा आणि महायुतीत समन्वय राखण्याचा सल्ला दिला होता. तसेच भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासाठी काम केले की नाही, असा थेट संशय व्यक्त केला होता. आनंद परांजपे यांच्या या गंभीर आरोपांना आणि सल्ल्याला भाजप आमदार प्रशांत बंब यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हाला त्यांच्या कोणत्याही सल्ल्याची अजिबात गरज नाही,” अशा कडवट शब्दांत बंब यांनी परांजपे यांचा समाचार घेतला आहे.

‘परांजपेंनी शब्द मागे घ्यावेत’ – प्रशांत बंब

प्रशांत बंब यांनी आनंद परांजपे यांच्यावर पलटवार करताना स्पष्ट केले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासाठी पूर्ण ताकदीने आणि इमानेइतबारे काम केले आहे. “मी माझ्या कामाचा कोणताही खुलासा करण्याची गरज नाही, पण असे बिनबुडाचे आरोप केले गेल्याने उत्तर देणे भाग आहे. सतीश चव्हाण स्वतः किंवा त्यांचे कार्यकर्ते या गोष्टीची साक्ष देतील,” असे बंब म्हणाले. तसेच अशा प्रकारे विनाकारण नावे घेऊन चिखलफेक करणे योग्य नसून, आनंद परांजपे यांनी आपले वक्तव्य आणि आरोप तातडीने मागे घ्यावेत, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – “हवेत बाण मारू नका…” महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच; नवनाथ बन यांच्या टीकेवर राणेंचं प्रत्युत्तर

‘आम्ही केवळ वरिष्ठ नेतृत्वाचे ऐकतो; असल्या भलत्या सल्ल्यांची गरज नाही’

आपल्या वक्तव्यात पुढे बोलताना प्रशांत बंब म्हणाले की, भाजप हा राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि भाजपचे कार्यकर्ते केवळ पक्षादेशाचे पालन करतात. “माझ्या रक्तात असल्या विचित्र गोष्टी किंवा गद्दारीचे धंदे नाहीत. महायुतीचा धर्म पाळत पक्षाने दिलेला आदेश आम्ही तंतोतंत पाळला आहे. परांजपेंनी आम्हाला बोट दाखवण्याची गरज नाही.” निवडणुकीत काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, तर त्यावर निर्णय घेण्यास आमचे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व पूर्णपणे समर्थ आहे. त्यामुळे परांजपे यांच्या सल्ल्याची पक्षाला कोणतीही आवश्यकता नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.


आनंद परांजपे यांनी काय केला होता भाजपवर आरोप?

गुरुवारी शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. “प्रत्येक निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा आपणच लढल्या पाहिजेत आणि जिंकल्या पाहिजेत, या भावनेला भाजपने आता मुरड घातली पाहिजे. शिवसेनेवर सतत आरोप करण्यापेक्षा जगात आणि देशात सर्वात मोठा दावा करणाऱ्या भाजपने स्वतःचे आत्मचिंतन करणे अधिक संयुक्तिक ठरेल,” असा सल्ला परांजपे यांनी दिला होता. याशिवाय अमरावती आणि नागपूरमधील राजकीय घडामोडींचा दाखला देत भाजपच्या आमदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर प्रशांत बंब यांनी दिलेल्या सडेतोड उत्तराबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number