Rani Baug Mumbai: राणीबाग फिरण्याचा खर्च वाढणार! तिकीट दरवाढीचा प्रस्ताव; जाणून घ्या नवे दर

मुंबईच्या राणीबागेचे तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

Rani Baug Mumbai: राणीबाग फिरण्याचा खर्च वाढणार! तिकीट दरवाढीचा प्रस्ताव; जाणून घ्या नवे दर
राणीबागेच्या सफरीला महागाईची झळ

मुंबई : मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेच्या प्रवेशशुल्कात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्राण्यांचा वाढता देखभाल खर्च, उपचार, खाद्य व्यवस्था आणि आगामी विकासकामांचा खर्च लक्षात घेऊन तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मुलांसाठी 25 रुपयांऐवजी 50 रुपये, तर प्रौढांसाठी 50 रुपयांऐवजी 100 रुपये मोजावे लागू शकतात.

राणीबाग ही मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः शालेय सहली, कुटुंबीय आणि पर्यटकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत प्रवेशशुल्क वाढीच्या प्रस्तावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठा निर्णय! रात्री उशिरा संघटनांची बैठक; अखेर काय ठरलं?

पालिकेच्या सूत्रांनुसार, गेल्या काही वर्षांत प्राण्यांच्या खाद्याचा खर्च, वैद्यकीय उपचार, निवास व्यवस्था आणि देखभालीवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारासह प्रस्तावित पक्षी उद्यान आणि आधुनिक मत्स्यालय उभारण्याच्या योजनांमुळे भविष्यातील खर्च आणखी वाढणार आहे. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी प्रवेशशुल्कात बदल करण्याची गरज असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, 2017 नंतर राणीबागेच्या प्रवेशशुल्कात मोठी वाढ करण्यात आलेली नाही. मात्र या काळात देखभाल खर्चात सातत्याने वाढ होत राहिल्याने आता शुल्काचा फेरविचार करण्यात येत आहे.

हेही वाचा: Mumbai Local Passenger Dispute: मुंबई लोकलमध्ये मराठी भाषेवरून दोन महिलांमध्ये वाद; म्हणाल्या, ‘तुम्हाला मराठी बोलता येत नसेल, तर…’

आकडेवारीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 25 लाख 42 हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला सुमारे 9 कोटी 85 लाख रुपयांचा महसूल मिळाला. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, सुविधा अधिक आधुनिक करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचेही प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, हा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नसून संबंधित स्तरावर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नव्या दरांबाबत अंतिम निर्णय होणार आहे. मात्र तिकीट दर दुप्पट होण्याची शक्यता समोर आल्यानंतर पर्यटकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही जण आधुनिक सुविधा आणि प्राण्यांच्या उत्तम देखभालीसाठी शुल्कवाढ योग्य असल्याचे म्हणत आहेत, तर काहींनी सामान्य नागरिकांवरील आर्थिक भार वाढू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number