सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या एका अजब लग्नाच्या प्रकरणाला आता एक नाट्यमय वळण मिळाले आहे. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात 75 वर्षीय वृद्धासोबत साखरपुडा आणि हळदीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर आता महिला ब्लॉगरने खुद्द मोठा खुलासा केला आहे. रामसागर यांच्यासोबतचे ते सर्व व्हिडिओ केवळ लाइक्स आणि व्ह्युजसाठी रचलेले एक नाटक होते, असा दावा करत तिने प्रत्यक्षात आपण दुसरेच लग्न केल्याचे स्पष्ट केले आहे.
रामसागर यांच्यासोबतच्या व्हायरल प्रकरणाचे सत्य
औरैया जिल्ह्यातील अरियारी गावात राहणारे 75 वर्षीय रामसागर आणि महिला ब्लॉगर रिना राजपूत यांच्यातील कथित प्रेमाची आणि साखपुड्याची चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. रिना सतत रामसागर यांच्या घरी जात असल्याने त्यांच्यात जवळीक वाढल्याचे आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी रामसागर यांच्या मुलीने म्हणजेच राधानेदेखील काही दावे केले होते. परंतु, आता रिनाने एकापाठोपाठ एक खुलासे करत हे सगळे दावे फेटाळून लावले आहेत. हा सगळा प्रकार केवळ सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने स्क्रिप्टेड पद्धतीने शूट करण्यात आला होता, असे तिने कबूल केले आहे.
हेही वाचा – प्रियकरासाठी पत्नीने रचला धक्कादायक कट; YouTube वर पाहिलं अन् पुढे जे घडलं…
पती परतल्यामुळे सर्व नाटक संपले; रिनाचे स्पष्टीकरण
इन्स्टाग्रामवर एकापाठोपाठ एक अनेक व्हिडिओ शेअर करत रिनाने सांगितले की, रामसागर यांच्यासोबतच्या लग्नाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिचा खरा पती अनपेक्षितपणे घरी परतला आहे. या घटनेनंतर तिच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून घरातील वातावरण ढवळून निघाले आहे. “मला लहान मुले आहेत आणि माझा स्वतःचा पती आहे, मग मी 75 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीशी लग्न कसे करू शकते?” असा थेट सवाल तिने उपस्थित केला आहे. आपल्याला जे करायला सांगितले, ते आपण केवळ व्हिडिओच्या स्क्रिप्टनुसार केले होते, असे स्पष्टीकरण तिने दिले.
पतीसोबतचा सिंदूर भरतानाचा व्हिडिओ केला शेअर
रिनाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पतीसोबतचे काही नवीन व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. यामध्ये दोघेही एकमेकांना प्रेमाने हार घालताना आणि एक तरुण तिच्या भांगात सिंदूर भरताना दिसत आहे. या माध्यमातून तिने आपले वैवाहिक आयुष्य आता रुळावर आल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, रामसागर यांच्या मुलीने केलेले सर्व दावे खोटे असून, जर खरोखरच साखरपुडा असता तर त्याची तयारी वेगळ्या पद्धतीने झाली असती, असे म्हणत तिने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले हे स्टंट आता उलटल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.