Pakistan-Afghanistan Durand Line Conflict : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये 11 आणि 12 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या मोठ्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील 'ड्युरंड रेषा' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच, ही रेषा म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यानचा सीमावाद आहे की काय आहे, याविषयीच्या चर्चाही पुन्हा सुरू झाल्या. कारण, ड्युरंड रेषेचा उल्लेख 'सीमा' असा करणे अफगाणिस्तानातील तालिबानला मान्य नाही. जाणून घेऊ, याबदद्ल अधिक..
पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले, तर अफगाणिस्ताननेही सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने दोहा येथे शांतता चर्चा होऊन दोन्ही देशांनी तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली.
या युद्धबंदी कराराच्या वेळी कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात ड्युरंड रेषेचा उल्लेख 'सीमा' (Boundary) असा करण्यात आला, ज्यामुळे अफगाणिस्तानचे अधिकारी अस्वस्थ झाले. याच 'सीमा' या शब्दावर तालिबानने तीव्र आक्षेप घेतला. या तीव्र विरोधामुळे अखेरीस कतारला आपल्या निवेदनामधून हा शब्द वगळावा लागला. याच घटनेमुळे, ही ड्युरंड रेषा नेमकी काय आहे आणि अफगाण लोक या रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा मानण्यास नकार का देतात, हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
हेही वाचा - US sanctions on Russia: अमेरिकेकडून रशियावर आर्थिक आघात; दोन प्रमुख तेल कंपन्यांवर कठोर निर्बंध
दरम्यान, अलिकडच्या काळात पाकिस्तानने या रेषेवर कुंपण घातलं आहे, तर अफगाण रक्षकांनी ते कुंपण तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनांमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढलेला आहे. या संदर्भातील वृत्तही समोर आले आहे.
ड्युरंड रेषा काय आहे?
ड्युरंड रेषा ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सुमारे 2,670 किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेली एक विवादास्पद सीमा आहे. 1893 मध्ये ब्रिटिश नागरी सेवक सर हेन्री मॉर्टिमर ड्युरंड आणि तत्कालीन अफगाण शासक अमीर अब्दुर रहमान यांच्यात एका कराराद्वारे ही रेषा निश्चित करण्यात आली होती. पुढे 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ही ड्युरंड रेषा पाकिस्तानला वारसा हक्काने मिळाली. पाकिस्तान या ड्युरंड रेषेला अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता देतो. तर, अफगाणिस्तानने मात्र आजतागायत कधीही या रेषेला तशी मान्यता दिलेली नाही आणि ती स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, ही सीमा रेषा दोन्ही देशांमधील सततच्या वादाचे मूळ ठरली आहे.
हेही वाचा - JeM Online Course: महिलांच्या भरतीसाठी जैश-ए-मोहम्मदकडून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू; मसूद अझहरच्या बहिणींच्या नेतृत्वाखाली देण्यात येतयं प्रशिक्षण